नवी दिल्ली - व्हॉट्सअपवर येणारे संदेश कोणतीही खातरजमा न करता पुढे फॉरवर्ड करून दिले जातात. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांना खतपाणी मिळतं. संपूर्ण देशात मुलं चोरी होण्याची अफवा पसरल्यापासून सामुहिक हिंसाचारातून अनेक निर्दोष लोकांचे जीव गेले आहेत. मागील 3 वर्षात 50 पेक्षा अधिक लोकांचे जीव सामुहिक हिंसाचारात गेले आहेत.
गृह मंत्रालयाने याआधीच सर्व राज्याच्या पोलील प्रमुखांना अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तरीही अशा घटनांच्या संख्येत कमी होताना दिसत नाही. सुरक्षा यंत्रणांच्यानुसार उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, झारखंडपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक हत्यांच्या मागे एकच कारण समजलं आहे ते म्हणजे व्हॉट्सअपवरून पसरणारी अफवा. व्हॉट्सअप मॅसेजच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात अफवा पसरवून हिंसाचाराचे प्रकार घडविले जात आहेत.
व्हायरल केला जातो मॅसेजलहान मुलं चोरी करण्याच्या नावावर हे मॅसेज फिरवले जातात. एखाद्या परिसरातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मुलं चोरी करणारी टोळी परिसरात सक्रीय झाली आहे. त्यातून एखाद्यावर संशयावर बळावला तर सामुहिक हिंसाचारातून त्याची हत्या केली जाते.
या मॅसेजमधील खोटी अफवा सत्य दाखविण्यासाठी एक व्हिडीओ पसरविला जातो. यामध्ये पाकिस्तानात मुलं चोरी होण्यापासून रोखण्यासाठी बनविलेल्या डॉक्युमेंट्रीचा भाग असतो. तर दुसरा व्हिडीओ बांग्लादेशचा आहे. या व्हिडीओंना एडिट करून पसरविणारी अफवा सत्य असल्याचा भास निर्माण केला जातो. अशा मॅसेजमुळे मानसिक रुग्ण, महिला यांना मुलं चोरी करणारी टोळी समजून लोकांकडून मार दिला जातो.
मुलं चोरी करण्याची अफवा पसरवून निर्दोष लोकांचे जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच यूपीमध्ये असा 18 घटना समोर आल्या. यात 50 हून अधिक लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरूवारी मुलं चोरी करणारा समजून एका साधूला मारहाण केल्याची घटना यूपीच्या गाजियाबाद येथे घडली. त्यामुळे व्हॉट्सअपवर येणारे संदेश फॉरवर्ड करण्याआधी त्याची खातरजमा करून घ्या, कारण तुमच्या एका चुकीच्या संदेशामुळे निर्दोष लोकांचे जीव जाण्याची शक्यता आहे.