कोटा : राजस्थानातील कोटा येथील जे.के. लोण शासकीय रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या नवजात बालकांची संख्या शनिवारी १०७ झाली. यातील १०० बालके एकट्या डिसेंबर महिन्यात मृत्युमुखी पडली आहेत. शनिवारी केंद्रीय पथकाने रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. कोटाचे खासदार तथा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी मृत बालकाच्या कुटुंबियांची भेट घेतली. बिर्ला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, जे.के. लोण रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्या काही नवजात बालकांच्या कुटुंबियांची मी भेट घेतली.मी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना दोन वेळा पत्रे लिहून वैद्यकीय सुविधा वाढविण्याच्या सूचनाही केल्या आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी शुक्रवारी रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, येथील बाल मृत्यूस वैद्यकीय हलगर्जीपणा कारणीभूत नाही. प्रशासकीय हलगर्जीपणाची काही प्रकरणे आहेत. दोषी असलेल्यांवर कारवाई केली जाईल.मागील पाच वर्षे सत्तेत राहिलेल्या भाजपने रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांत वाढ केलेली नसल्यामुळे बालमृत्यूचा हा प्रकार घडला आहे. २०१२ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने रुग्णालयाला ६० खाटा मंजूर केल्या होत्या. त्या कुठे गेल्या आहेत? या मंजूर खाटा रुग्णालयाला मिळाल्या असत्या, तर रुग्णालयातील खाटांची संख्या १०२ झाली असती. त्यामुळे एका खाटेवर दोन बालकांना ठेवण्याची वेळच आली नसती. शर्मा यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. १५ जानेवारीपर्यंत केंद्रिकृत आॅक्सिजन व्यवस्था रुग्णालयात बसविली जाईल. सर्व उपकरणेही अद्ययावत केली जातील.बुंदी येथील रुग्णालयात १० बालकांचा मृत्यूकोटा येथील नवजात बालकांच्या मृत्यूवरून गदारोळ सुरू असतानाच राजस्थानातील बुंदी येथील शासकीय रुग्णालयात डिसेंबरमध्ये १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रुग्णालयाला भेट दिली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. रुग्णालयाच्या प्रशासनाने म्हटले की, हे बालमृत्यू अनेक कारणांनी झाले आहेत. रुग्णालयाचा हलगर्जीपणा यास कारणीभूत नाही.
बालमृत्यू : केंद्रीय पथकाने रुग्णालयाला दिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 6:10 AM