नवी दिल्ली : अल्पवयीन मुलांच्या अश्लिल चित्रफिती बनवून त्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल करणारी आंतरराष्ट्रीय टोळी सीबीआयने गेल्या महिन्यात उद्ध्वस्त केली होती. लाजीरवाणी गोष्ट म्हणजे या ग्रूपमध्ये सर्वाधिक मेंबर्स हे भारतीय होते अशी माहिती सीबीआयच्या चौकशीमध्ये समोर आली आहे. 40 देशांचे एकूण 119 सदस्य या ग्रुपमध्ये होते, त्यापैकी सर्वाधिक सदस्य एकट्या भारतातून होते. भारताखालोखाल पाकिस्तान आणि अमेरिकेचे सदस्य होते अशी माहिती सीबीआयने दिली.
अल्पवयीन मुलांच्या अश्लिल चित्रफिती चित्रीत करुन या व्हॉट्सअप ग्रुपवर झळकविल्या जातात अशी माहिती मिळाल्यावरुन सीबीआयने मुंबई, दिल्ली, नोइडा, उत्तर प्रदेशातील कनौज येथील पाच ठिकाणी छापे मारले. निखिल वर्माच्या चौकशीदरम्यान अशी माहिती उजेडात आली की, त्याने सुरु केलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अमेरिका, चीन, न्यूझीलंड, मेक्सिको, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्राझिल, केनिया, नायजेरिया, श्रीलंका या देशांसह भारतातल्या अन्य भागांतील मिळून ११९ सदस्य आहेत. सीबीआयने या प्रकरणी मारलेल्या छाप्यांदरम्यान अनेक मोबाइल फोन, लॅपटॉप, हार्डडिस्क व अन्य डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.
निखिल वर्मा याच्यासह दिल्लीतील नफीस रझा, झाहिद, मुंबईतील सत्येंद्र ओमप्रकाश चौहान व नोईडातील आदर्श यांनाही सीबीआयने अटक केली आहे. व्हॉट्सअप सर्व्हिलियन्सचा वापर न करता सीबीआयने आपल्या खब-यांमार्फत गेले तीन महिने या प्रकरणाची खडानखडा माहिती मिळवली. या अश्लील चित्रफिती जिथून अपलोड केल्या जात असत त्या संगणकाच्या व मोबाइल फोनच्या इंटरनेट जोडणीचे आयपी अॅड्रेसेस शोधून त्या त्या ठिकाणी सीबीआयची पथके गेली व त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी अटक केलेल्यांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या आरोपींचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास त्यांना सात वर्षांचा कारावास व १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. या व्हॉट्सअप ग्रुपमधील भारतात असलेले व विदेशातील सदस्यांचाही सीबीआय शोध घेत आहे.