ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30- सोशल मीडियाच्यामाध्यमातून अनेक चांगल्या-वाईट घटना घडत असल्याचं आपण बघतो आहे. पण गैरव्यवहारासाठी सोशल मीडियाचा वापर किती उंचीपर्यंत होऊ शकतो याचं उदाहरण दिल्लीमध्ये बघायला मिळालं आहे. एका मुलाचं अपहरण करून त्याला जास्तीत जास्त किंमतीला विकण्यासाठी एका महिलेने त्या मुलाचा फोटो व्हॉट्सअॅपवर अपलोड करून त्याची बोली लावली. या माध्यमातून त्या मुलाला विकण्यासाठी एक लाख ऐशी हजार रूपयांची किंमतही निश्चित झाली. विशेष म्हणजे या व्हॉट्सअॅप सेलमुळेच आरोपी महिला आणि तिच्या तीन साथिदारांना पकडण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांना पकडलेल्या तिघांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनूसार, या तीन महिला लहान मुलांना दत्तक घेण्याच्या तसंच सरोगसीच्या रॅकेटमधील आहेत. या मुलाचं जामा मशिदीजवळून अपहरण करण्यात आलं होतं. तसंच त्या मुलाला जास्तीत जास्त किंमतीमध्ये विकता यावं यासाठी त्याला सहा वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी नेण्यात आलं होतं. या मुलाचा फोटो एका व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर बघितल्यानंतर त्या संदर्भातील माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पकडलं जाण्याच्या भीतिने आरोपी महिलेने त्याला रघुवीर नगरमधील एका मंदिरात सोडून दिलं आणि पोलिसांना फोन करून बेवारस मुलगा दिसल्याची माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी तपास करत तीन महिला आणि एक पुरूषाला अटक केली आहे. राधा, सोनिया, सरोज आणि जान मोहम्मद अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार अपहरणाची तक्रार दाखल केली होती. जामा मशिदीच्या एसएचओ अनिल कुमार यांच्या अध्यतेखाली एक टीम नेमून अपहरणकर्त्याचा शोध लावला गेला, अशी माहिती पोलीस अधिकारी मंदीप सिंह रंधावा यांनी दिली आहे.
चौकशी दरम्यान मुलाचं अपहरण कसं केली त्याची माहिती आरोपी जान मोहम्मद याने पोलिसांना दिली आहे. 5 जून रोजी जामा मशिदजवळ गेट नंबर एक जवळून मुलाला उचलण्यात आलं होतं. त्याचे आई-वडील नमाजची तयारी करत असताना त्याचं अपहरण करून त्याला शकुरपूरमध्ये राहणाऱ्या आरोपी राधाच्या घरी नेण्यात आलं. मुलाला विकल्यानंतर त्याची चांगली किंमत दिली जाइलं, असं राधाने सांगितल्यामुळे अपहरण केल्याची कबूली आरोपी जान मोहम्मद याने पोलिसांसमोर दिली आहे. राधाने त्या मुलाला काही दिवस आपल्या घरी ठेवलं आणि त्यानंतर दुसरी आरोपी सोनीयाला एक लाख रूपयांमध्ये त्या मुलाला विकलं. सोनीयाने या मुलाला सरोज नावाच्या तिसऱ्या महिलेला विकलं. जास्त पैसा मिळावा या उद्देशाने सरोजने त्या मुलाचा फोटो व्हॉट्सअॅपवर शेअर केला. याच दरम्यान पोलिसांनी चौकशीसाठी केबल ऑपरेटरशी संपर्क करत त्या मुलाचा फोटो टिव्हीवर दाखविण्यात आला. भाग्यवश नावाच्या व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या व्यक्तीने मुलाचा टिव्हीवर फोटो पाहून जामा मशिद पोलीस स्टेशनशी संपर्क केला. या व्यक्तीच्या माहितीनंतर आरोपी सरोजला पकडण्यासाठी टीम नेमण्यात आली. आपण पोलिसांच्या कचाट्यात सापडणार हे लक्षात आल्यानंतर सरोजने स्वतः पोलिसांना फोन करून बेवारस मुलगा सापडल्याचं सांगितलं. त्यानुसार मुलाला वाचविण्यात आलं. पोलिसांना फोन करणाऱ्या सरोजचा नंबर परत तपासण्यात आला तेव्हा तो नंबर बंद आला. पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी तो नंबर ट्रॅक केल्यानंतर सरोज पोलिसांच्या तावडीत सापडली आणि संपूर्ण घटना समोर आली. पोलिसांच्या माहितीनूसार सरोज, राधा आणि सोनिया यांची ओळख आयवीएफ क्लिनिकमध्ये झाली होती. याआधीसुद्धा या महिलांनी एका मुलाला गुडगावमध्ये विकलं असल्याचा संशय पोलिसांना आहे.