अहमदाबाद : घटस्फोटाच्या प्रकरणात पत्नीसोबत मुलालाही पोटगी देण्याचा आदेश झाला, तरी मुलगा १८ वर्षांचा होईपर्यंतच त्याला पोटगी देणे पतीवर कायद्याने बंधनकारक आहे, असा निकाल गुजरात उच्च न्यायालयाने दिला आहे.विसनगर येथील डॉ. दिनेश ओझा व त्यांची पत्नी नीता यांच्या प्रकरणात न्या. जे. बी. परडीवाला यांनी हा निकाल दिला. २००६मध्ये मुलासह घरातून हाकलून दिल्यानंतर, नीता यांनी पोटगीसाठी तर दिनेश यांनी घटस्फोटासाठी दावा दाखल केला. नीताच्या दाव्यात कुटुंब न्यायालयाने तिला आणि तिच्या मुलाला दरमहा ठरावीक पोटगी देण्याचा आदेश दिला होता. मुलगा १८ वर्षांचा झाल्यावर दिनेश यांनी पोटगी बंद केली. त्याविरुद्ध नीताने कुटुंब न्यायालयात तक्रार केली. त्यावर कायद्यानुसार १८ वर्षांनंतरही मुलाला पोटगी देणे पित्यावर बंधनकारक आहे का, याचा खुलासा उच्च न्यायालयाकडून करून घेण्यास नीता यांस सांगण्यात आले.अर्जावरील सुनावणीत नीताच्या वकिलाने असा युक्तिवाद केला की, मुलगा कमावता होईपर्यंत त्याचे पालन-पोषण करणे, ही दिनेश यांची जबाबदारी आहे. मात्र, दिनेश यांच्या वकिलाने मुलगा १८ वर्षांचा होईपर्यंतच पोटगी देणे बंधनकारक असल्याचा मुद्दा मांडला. दिनेश यांच्या वकिलाचे म्हणणे मान्य करून न्या. परडीवाला यांनी म्हटले की, केवळ आपली अपत्ये म्हणून नव्हे, तर देशाचे भावी नागरिक म्हणूनही मुलांना योग्य शिक्षण देऊन व चांगले संस्कार करून मुलांचे संगोपन करणे पित्याचे कर्तव्य आहे. मुलीचे लग्न होईपर्यंत तिची जबाबदारी पित्यावर असली, तरी मुलाच्या बाबतीत मात्र, ही जबाबदारी फक्त तो १८ वर्षांचा होईपर्यंतच असते. (वृत्तसंस्था)कलम १२५ चा आधारघटस्फोट आणि पोटगीची प्रकरणे हिंदू विवाह कायद्यानुसार चालतात. या कायद्यात घटस्फोट होईपर्यंत पत्नी व मुलांना अंतरिम स्वरूपाची व घटस्फोट झाल्यावर कायम स्वरूपाची पोटगी पतीने देण्याची तरतूद आहे. मात्र, मुलाच्या बाबतीत अशी पोटगी किती काळ द्यावी, याविषयी स्पष्टता नाही. म्हणून न्यायालयाने यासाठी दिवाणी प्र्रक्रिया संहितेच्या कलम १२५चा आधार घेतला. त्यानुसार, मुलीचे लग्न होईपर्यंत व धडधाकट मुलगा १८ वर्षांचा होईपर्यंत त्यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी माता-पित्यावर टाकलेली आहे.न्यायालय म्हणाले... घटस्फोटानंतरही पत्नीच्या पालन-पोषणाची जबाबदारी कायद्याने पतीवर येत असली, तरी तिच्यापासून झालेला मुलगा धडधाकट असेल, तर त्याला आयुष्यभर पित्याने पोसावे, अशी कायद्याची अपेक्षा नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मुलाला फक्त १८ वर्षांपर्यंत पोटगी
By admin | Published: March 20, 2016 4:24 AM