मुजफ्फरनगर : २०१३ च्या मुजफ्फरनगर दंगलीदरम्यान आपल्या गावातून विस्थापित झालेल्या एका ३५ वर्षीय गर्भवती महिलेला शासकीय रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिल्यामुळे तिला रस्त्यावरच बाळाला जन्म द्यावा लागल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. या घटनेची चौकशी करण्याचा आदेश मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने दिला आहे.ही दंगलग्रस्त गर्भवती महिला सोमवारी आपल्या पतीसोबत कांढला येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळंतपणासाठी आली होती. परंतु तिच्या बाळंतपणाला अद्याप तीन-चार दिवसांचा अवधी आहे असे सांगून डॉक्टरांनी तिला घरी परत जाण्यास सांगितले. या दरम्यान तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. तरीही डॉक्टरांनी तिच्याकडे दुर्लक्ष करून रुग्णालयात दाखल करण्यात नकार दिला. त्यामुळे या महिलेच्या पतीने तिला परत घरी नेण्याचे ठरविले. हे दोघे घरी परतत असतानाच तिने रस्त्यावर बाळाला जन्म दिला.बाळाच्या जन्मानंतर मात्र या महिलेला सीएमओ व्ही. अग्निहोत्री यांच्या निर्देशानुसार शामली जिल्ह्यातील रुग्णालयात हलविण्यात आले. (वृत्तसंस्था)
दंगलग्रस्त महिलेचे रस्त्यावर बाळंतपण
By admin | Published: June 22, 2016 2:53 AM