नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात निर्माण झालेली चिंताजनक परिस्थितीती अद्यापही कायम आहे. या साथीमुळे दररोज देशभरात ५० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, देशातील अनलॉकचे तीन टप्पे संपून चौथा टप्पा सुरू होण्याची वेळ जवळ आली तरी लोक पूर्वीप्रमाणे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. ऑक्सफर्डच्या कोविड - १९ लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आजपासून सुरुवात करणार आहे. मात्र, याच सीरमच्या सर्वेक्षणानुसार लहान मुलांपासून युवकांना कोरोनाचा अधिका धोका असल्याचं समोर आलं आहे.
राजधानी दिल्लीत 5 ते 17 वर्षांच्या मुलांना व युवकांना कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर प्रकृतीची जादा काळजी करावी लागत आहे. दिल्लीत या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुतून ही माहिती समोर आली आहे. याच सर्वेक्षणानुसार दिल्लीतील 29.1 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी विकसीत झाल्याचं सांगण्यात आलंय. सर्वेक्षणात 15 हजार नागरिकांचा सहभाग घेण्यात आला होता, त्यामध्ये जवळपास 25 टक्के 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. तर 18 ते 50 वर्षे वयाच्या लोकांची संख्या 50 टक्के होती. उर्वरीत 25 टक्के नागरिकांची संख्या 50 वर्षांपेक्षा अधिक होती.
सर्वेक्षणानुसार 5 ते 17 वर्षीय मुलांमध्ये 34.7 टक्के कोरोनाचे संक्रमण संवेदनशील आहे. तर, 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांमध्ये 31.2 टक्केच लोक कोरोना व्हायरसने संक्रमणानंतर बरे झाले आहेत. देशात, 21 ते 50 वर्षीय नागरिकांची कोरोनाबाधित संख्या सर्वाधिक आहे. भारतीय वैद्यकीय अनुसंधान संस्थेच्या आकड्यांनुसार देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 21 ते 50 वयाचे 61.31 टक्के नागरिक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे, ही आकडेवारी 21 ऑगस्टपर्यंतची आहे.
लोकल सुरु करण्याचा विचार, पण...
दरम्यान, अनलॉक-४ च्या टप्प्यात देशातील विविध महानगरांमधील लोकल आणि मेट्रो सेवा तसेच शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र अद्यापही बहुतांश लोक हे लोकल किंवा मेट्रोने प्रवास करण्यास तसेच मुलांना शाळेत पाठवण्यास अनुत्सुक असल्याचे समोर आले आहे. लोकल सर्कल्सने केलेल्या सर्वेनुसार ६२ टक्के पालकांनी आपण अद्यापही आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचे सांगितले. तसेच केवळ सहा टक्के लोकांना पुढच्या दोन महिन्यांत आपण चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. कोरोनाच्या संसर्गाची भीती एवढी आहे की, त्यामुळे ९४ टक्के लोकांनी पुढच्या दोन महिन्यांनंतरसुद्धा चित्रपटगृहात जाण्यास तयार नसल्याचे सांगितले.
ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या चाचणीला सुरुवात
केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यास ३ ऑगस्ट रोजी परवानगी दिली होती. या चाचण्या १७ निवडक ठिकाणी करण्यात येत आहेत. यात एम्स दिल्ली, बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे, राजेंद्र मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, पाटणा यासह अन्य ठिकाणांचा समावेश आहे. १८ वर्षांवरील १६०० नागरिक या चाचणीत सहभागी होणार आहेत. ब्रिटनमध्ये पाच ठिकाणी या लसीची दोन टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे आणि ती पूर्णपणे सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अँटीबॉडीज तयार झाल्याचेही दिसून आले आहे.