ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपुरम, दि. १७ - मुला-मुलींनी कॉलेजमध्ये शेजारीशेजारी वा एकत्र बसण्याची काही एक गरज नाही असे अजब आणि वादग्रस्त वक्तव्य केरळचे शिक्षणमंत्री पीके अब्दू रब्ब यांनी केले आहे. कोझीकोडे येथील फारूख कॉलेजमध्ये एका विद्यार्थी काही मुलींसोबत बसल्याने त्याला कॉलेजमधून निलंबित करण्यात आले असून या मुद्यावरून राज्यातील वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर बोलताना अब्दू रब्ब यांनी आपण मुला-मुलींनी एकत्र बसण्याच्या विरोधात असल्याचे सांगितले. कॉलेजमध्ये एखाद्या मुलाने मुलीसोबत बसणे आपल्याला पटत नाही, मात्र हे आपले वैयक्तिक मत असल्याते अब्दू रब्ब यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावरून राज्यात आता नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.
फारूख कॉलेजमध्ये बीए सोशोलॉजीच्या पहिल्या वर्षाला शिकणारा दिनू के व त्याचे काही मित्र वर्गात मुलींसोबत बसले होते, मात्र हे कॉलेजच्या नियमांविरोधात असल्याचे सांगत त्यांच्या शिक्षकांनी त्यांना एकत्र बसण्यास मनाई केली. हा लैंगिक भेदभाव असल्याचे सांगत एका विद्यार्थीनीने घडलेल्या प्रकाराविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता त्या शिक्षकांनी ओरडून तिलाच गप्प केले आणि ज्यांना कॉलेजचे नियम पाळायचे नाहीत, त्यांना वर्गातबाहेर जाण्यास सांगितले. या प्रकारानंतर नऊ विद्यार्थअयांना वर्गाबाहेर जावे लागले आणि याप्रकाराविरोधात आवाज उठवणा-या व माफी मागण्यास नकार देणा-या दिनू के या विद्यार्थ्याला कॉलेजमधून निलंबित करण्यात आले होते. मात्र केरळ उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली असून या मुद्यावरून राज्यातील वातावरण बरेच तापले आहे.