भारतीय जनता पक्षाच्या तामिळनाडू युनिटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही, तर या प्रसंगी, नियोजित इतर योजनांमध्ये 720 किलो ग्रॅम मासेही वाटण्यात येणार आहेत. यासंदर्भात माहिती देताना, 'आम्ही चेन्नईतील RSRM या सरकारी रुग्णालयाची निवड केली आहे. येथे पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी जन्मनाऱ्या सर्व मुलांना सोन्याची अंगठी देण्यात येईल,' असे मत्स्यव्यवसाय आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी म्हटले आहे.
यावेळी मुरुगन यांना अंगठी वाटप कार्यक्रमासाठी होणाऱ्या खर्चासंदर्भात विचारले असता, प्रत्येक अंगठी ही सुमारे 2 ग्रॅमची असेल, तिची किंमत सुमारे 5000 रुपयांपर्यंत असू शकते. तसेच, ही मोफत वाटली जाणारी रेवाडी नाही. तर या माध्यमाने आम्ही पंतप्रध मोदी यांच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या बालकांचे स्वागत करणार आहोत, असे मुरुगन यांनी म्हटले आहे. या रुग्णालयात 17 सप्टेंबरला 10 ते 15 बालकांचा जन्म होऊ शकतो, असा भाजपच्या स्थानिक युनिटचा अंदाज आहे.
720 किलो मासे वाटण्याची तयारी - या प्रसंगी तामिळनाडूनत तब्बल 720 किलो मासेही वाटण्यात येणार आहेत. हे मासे वाटण्यासाठी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा (PMMSY) उद्देश मत्स्य विक्रीस प्रोत्साहन देणे, असा आहे. यामुळे आम्ही हे पाऊल उचलत आहोत. आम्हाला माहित आहे, की पंतप्रधान मोदी हे शाकाहारी आहेत. तसेच, यावेळी ते 72 वर्षांचे होत आहेत. यामुळे आम्ही 720 हा आकडा निवडला आहे, असेही मत्स्यव्यवसाय मंत्री मुरुगन यांनी म्हटले आहे.
दिल्लीतही विशेष कार्यक्रम -पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली भाजप 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान 'सेवा पंधरवाडा' साजरा करणार आहे. यादरम्यान, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरांसोबतच इतरही अनेक कार्यक्रम होणार आहेत. दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी म्हटल्यानुसार, यादरम्यान एका विशेष शर्यतीचेही आयोजित केले जाईल, यात झोपडपट्टी भागातील लोकही सहभाग घेऊ शकतील. 18 ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या शर्यतीला हिरवा झेंडा दाखवतील. शहरातील झोपडपट्टीतील सुमारे 10,000 लोक या शर्यतीत सहभागी होतील.