नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यू. यू. लळीत यांनी न्यायालयीन कामकाजासंदर्भात नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या खंडपीठाने शुक्रवारी नेहमीच्या वेळेपेक्षा १ तास आधीच सकाळी साडेनऊ वाजता कामकाजाला सुरुवात केली. लहान मुले सकाळी ७ वाजता शाळेत जाऊ शकतात, तर न्यायाधीश आणि वकील सकाळी ९ वाजता कामकाजाला सुरुवात का करू शकत नाही, अशी भूमिका लळीत यांनी मांडली.
न्या. एन. व्ही. रमण हे २७ ऑगस्टला सेवानिवृत्त झाल्यानंतर न्या. लळीत हे सरन्यायाधीश होऊ शकतात. मात्र, त्यांचा कार्यकाळ केवळ ८ नोव्हेंबरपर्यंतच राहील.
सकाळी ९ वाजता कोर्ट सुरू व्हावेन्या. लळीत, न्या. एस. रवींद्र भट आणि न्या. सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने लवकर कामकाज सुरू केले. यावर माजी ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आनंद व्यक्त केला. सकाळी साडेनऊ वाजेची वेळ न्यायालयीन कामकाज सुरू करण्यासाठी योग्य असल्याचे रोहतगी म्हणाले. त्यावर उत्तर देताना न्या. लळीत यांनी सांगितले, की न्यायालयाचे काम लवकर सुरू झाले पाहिजे, असे आपल्याला नेहमी वाटत होते. खरे तर सकाळी ९ वाजता काम सुरू व्हायला हवे, असे सांगताना त्यांनी शालेय विद्यार्थ्यांचे उदाहरण दिले.
साडेदहाला सुरू होते कामकाजसध्याच्या वेळेनुसार सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सकाळी साडेदहा ते दु. ४ वाजेपर्यंत सुरू राहते. त्यात दुपारी १ ते २ या वेळेत लंच ब्रेक असतो.
- ४.१८कोटी केसेस सध्या देशातील कोर्टांमध्ये प्रलंबित. ५०% प्रलंबित खटले उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल या कनिष्ठ न्यायालयांतील आहेत.
ज्यावेळी प्रदीर्घ सुनावणीची गरज नसेल, त्या दिवशी न्यायालयाचे काम सकाळी ९ वाजता सुरू व्हायला हवे. सकाळी साडेअकरा वाजता अर्धा तासाची विश्रांती घेऊन दुपारी २ वाजेपर्यंत काम करावे. यामुळे सायंकाळी अतिरिक्त काम करण्यास वेळ मिळेल. न्यायाधीश यू. यू. लळीत