भुवनेश्वर : कर्जाची परतफेड करण्यासाठी विधवा महिलांना त्यांच्या मुलांना गहाण ठेवण्याचा धक्कादायक प्रकार ओडिशात समोर आला आहे. याबाबत करण्यात आलेल्या याचिकेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाने ओडिशा आणि तेलंगणाच्या मुख्य सचिवांकडून चार आठवड्यांत कारवाईचा अहवाल मागवला आहे.
गरीब विधवांच्या मुलांना मजूर म्हणून काम करण्याची सक्ती का केली जात आहे, असा सवाल आयोगाने केला आहे. कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या महिलांच्या मुलांना मजूर म्हणून काम करण्यास भाग पाडले जात असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये आढळून आले आहे. स्वातंत्र्यानंतर आपण समाजाचे वर्णन सुशिक्षित आणि जागरूक असे करतो. अशा काळात गरीब वर्गाला अशा प्रकारे जबरदस्तीने गुलामगिरीने वागवले जात आहे.
मानवाधिकार कार्यकर्ते राधाकांत त्रिपाठी यांनी गरीब विधवा महिला व त्यांच्या मुलांची हेळसांड याबाबत याचिका दाखल केली आहे. कर्जाची परतफेड न केल्यामुळे काही मुलांना इतर लोकांची गुरे चारावी लागतात तर काहींना वीटभट्टीवर काम करावे लागले, असे या याचिकेत म्हटले आहे.
प्रकरण पहिले...
ओडिशातील बलांगीर जिल्ह्यातील शुकदेव परभुये हे हैदराबादजवळील वीटभट्टीवर काम करायचे. आजारी पडल्याने ८ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. शुकदेव यांनी भट्टीमालकाकडून ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले असल्याने त्यांच्या पत्नीला त्यांची १२ वर्षांची मुलगी गहाण ठेवण्यास भाग पाडण्यात आले.
प्रकरण दुसरे...
ओडिशातील क्योंझर जिल्ह्याच्या गढुली गावातील सावित्री नायक या आदिवासी महिलेने २६ जानेवारी २०१६ रोजी आपल्या पतीच्या अंत्यसंस्कारासाठी शेजाऱ्याकडून ५ हजार रुपये उसने घेतले होते. त्याची परतफेड करण्यात अपयश आल्याने ३ मुलांची आई १३ आणि ११ वर्षांच्या दोन मुलांना गहाण ठेवण्यास भाग पाडण्यात आले. कर्ज फेडून घेण्यासाठी त्यांच्याकडून महिनाभराहून अधिक काळ शेजाऱ्याची गुरे चारणे तसेच इतर कामे करून घेण्यात आली.