नवी दिल्ली - स्मार्टफोन हा हल्ली जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मोठ्यांप्रमाणे आता चिमुकल्यांना देखील मोबाईलची सवय लागली आहे. विशेषत: गेम खेळण्यासाठी त्यांना सतत फोन हवाच असतो. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलांची ऑनलाईन गेम खेळण्याची सवय ही काही आई-वडिलांना चांगलीच महागात पडली आहे. गेम खेळता खेळता मुलांनी केलेला कारनामा पाहून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. मुलांनी खेळताना तब्बल 11 लाखांहून अधिक किंमतीची हत्यारं खरेदी केली आहेत. एवढंच नाही तर जवळपास एक लाखाच्या 5G मोबाईलची देखील खरेदी केली केली आहे. बँक खात्यातून पैसे कमी झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार पालकांच्या लक्षात आला आहे.
ललीतपूर, झाशी आणि जालौन या ठिकाणी या भयंकर घटना घडल्या आहेत. सायबर पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. ऑनलाईन खरेदी केल्यानंतर मुलांनी बँकेतून येणारा मेसेज देखील डिलीट केला आहे. आई-वडिलांनी बँकेतून स्टेटमेंट काढलं असता त्यांना पैसे कमी झाल्याचं लक्षात आलं. अशाच प्रकारच्या तीन घटना घडल्या आहेत. ललीतपूरमध्ये एका ठेकेदाराच्या मुलाने ऑनलाईन गेम खेळण्यास सुरुवात केली होती. गेममधील स्टेज पार करता करता त्याने गेममध्ये वापरण्यात आलेली हत्यारं आणि मोबाईलची खरेदी केली. वडिलांच्या खात्यातून जवळपास दीड लाखांची खरेदी केली. जेव्हा वडिलांना हे समजलं तेव्हा त्यांना धक्काच बसला.
झाशीमध्ये देखील एका मुलाने ऑनलाईन फ्री फायर गेम खेळल्यानंतर तब्बल सात लाखांहून अधिक किंमतीची हत्यारं आणि 5G मोबाईलची खरेदी केली आहे. घरच्यांच्या हा प्रकार लक्षात आला तेव्हा त्यांनी तातडीने पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तसेच जालौनमध्ये राहणाऱ्या रामलखन यांच्या मुलाने देखील दोन लाखांची खरेदी केली. खात्यातून पैसे अचानक गायब झाल्याने आई-वडील अचानक घाबरले आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली पण त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी या प्रकरणी मुलांकडे अधिक चौकशी दिली असता. त्यांनी हत्यारांची खरेदी केल्याची कबुली दिली आहे.
सध्या ऑनलाईन अनेक गेम उपलब्ध आहेत. ज्याची सुरुवातीची स्टेज ही फ्री असते मात्र नंतर पुढे जाण्यासाठी पैसे जमा करावे लागतात. तसेच गन आणि इतर हत्यारं खरेदी करण्यासाठी पैसे जमा करावे लागतात अशी माहिती मुलांनी पोलिसांना दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी गेम खेळण्यासाठी मुलाच्या हातात अवघ्या तासाभरासाठी फोन देणं चांगलंच भारी पडलं होतं. बिल भरण्याठी वडिलांना पैशासाठी कार विकावी लागल्याची घटना समोर आली होती. ब्रिटनमधील 7 वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये खेळण्यासाठी आयफोन देणं वडिलांना महागात पडलं. मुलाने आयफोनवर गेम खेळता-खेळता इतकं बिल केलं की ते चुकवण्यासाठी वडिलांवर आता कार विकण्याची वेळ आली. या मुलाने खेळता-खेळता थेट 1.30 लाख रुपये बिल केल्यानंतर पालकांना याबाबत माहिती झाली.