नवी दिल्ली - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे. पार्श्वभूमीवर १८ वर्षे वयापर्यंतच्या मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे. १२ ते १८ वयोगटातील मुलांचे पुढील महिन्यापासून लसीकरण केले जाईल, असे सूतोवाच नवनियुक्त केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केले आहे.
झायकोव्ह डी
निर्माती कंपनी : झायडस
लसीच्या नैदानिक चाचण्या पूर्ण झाल्या असून आपत्कालीन वापराच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
कोव्हॅक्सिन
निर्माती कंपनी : भारत बायोटेक
औषध महानियंत्रकांनी भारत बायोटेकला २ ते १८ वयोगटातील मुलांवर लसीच्या नैदानिक चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. सप्टेंबरपूर्वी या चाचण्या पूर्ण होऊन आपत्कालीन वापराची मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.
फायझर
निर्माती कंपनी : फायझर
या लसीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिली आहे. फायझरने भारत सरकारकडे लस परवान्यासाठी अर्ज केला असून त्यास मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे म्हणणे...
अखिल भारतीया आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार सप्टेंबरपर्यंत झायडस, भारत बायोटेक आणि फायझर या तीनही कंपन्यांच्या लसींना मान्यता मिळण्याची शक्यता आहे. लसींमुळे मुलांचा कोरोनापासून बचाव होऊ शकतो आणि संक्रमणाची साखळी तोडली जाऊ शकते, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.
‘द लॅन्सेट’ या विज्ञान विषयाला वाहिलेल्या मासिकात अलीकडेच प्रकाशित झालेल्या अभ्यास अहवालात ११ ते १७ वयोगटातील मुलांबरोबर राहात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना होण्याचा धोका १८ ते ३० टक्क्यांनी वाढतो. या कारणांमुळेच मुलांना विद्यालयांत पाठवण्यास नकार दिला जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.