डेहराडून : सध्याच्या काळात महिला फाटकी जीन्स घालणे पसंत करतात. त्या आपल्या मुलांवर चांगले संस्कार कसे काय करणार, असे वादग्रस्त उद्गार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी काढले. रावत यांच्या उद्गारांचा देशभरातील महिला नेत्या व विविध पक्षांनी तीव्र निषेध केला आहे. डेहराडून येथे बालहक्क संरक्षण आयोगाच्या एका कार्यशाळेचे तीरथसिंह रावत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते म्हणाले की, उत्तम संस्कार होत नसल्यामुळे युवा पिढी चित्रविचित्र फॅशनचे कपडे घालतात. तीरथसिंह रावत हे एकदा विमानप्रवास करत असताना त्यांच्या शेजारी बसलेल्या महिलेने गुडघ्यावर फाटलेली जीन्स घातली होती व दोन्ही हातात भरपूर बांगड्या घातल्या होत्या. पायात बूट घातले होते. या महिलेसमवेत तिची दोन्ही मुलेही प्रवास करत होती. त्या प्रसंगाचे वर्णन करताना तीरथसिंह रावत म्हणाले की, ही महिला एक स्वयंसेवी संस्था चालविते. गुडघ्यावर फाडलेली जीन्स घालून ही महिला सर्वत्र जात असेल तर त्याचे तिच्या मुलांवर मनावर चांगले संस्कार होणार नाहीत.
कपड्यांवरून कोणालाही जोखू नका : जया बच्चन- एखाद्याने कोणते कपडे घातले आहेत यावरून त्याची सांस्कृतिक पातळी तुम्ही कशी काय ठरवू शकता, असा खडा सवाल समाजवादी पक्षाच्या खासदार व अभिनेत्री जया बच्चन यांनी मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांना विचारला आहे. - तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी सांगितले की, विमानातील महिला सहप्रवाशाला आपादमस्तक न्याहाळणाऱ्यांकडे आम्ही जेव्हा बघतो त्यावेळी आम्हालाही त्याच्यात एक निलाजरा माणूस दिसू लागतो. - महिलांच्या कपड्यांकडे पाहून त्यांच्याबाबत मते बनविण्याची सवय तीरथसिंह रावत यांनी बदलली पाहिजे. मुख्यमंत्री विचारपद्धती बदला म्हणजे देश बदलेल, असा टोला शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी लगावला.