नवी दिल्ली : धूम्रपानाचे व्यसन ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. आता पुरुषांसोबत महिलाही मोठ्या प्रमाणात धूम्रपानाच्या आहारी जाताना दिसत आहेत; परंतु महिलांच्या धूम्रपानामुळे भविष्यात त्यांना होणाऱ्या मुलांचेही आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. या महिलांच्या मुलांची फुफ्फुसे लहान असल्याचे दिसून येत आहे.
तसेच या मुलांना बालवयातच दम्यासारखे विकार होत आहेत. अनेक उपचार केल्यानेही दमा पूर्ण बरा होत नसल्याचे आढळले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच जारी केलेल्या बुलेटिनमध्ये महिलांमधील धूम्रपानाच्या मुलांवर होणाऱ्या दुष्परिणामांचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार आईच्या धूम्रपानामुळे मुलांच्या फुफ्फुसांसह एकूणच शारीरिक वाढीवरही प्रतिकूल परिणाम होतात. धूम्रपान केल्याने किशोरावस्था आणि वृद्धापकाळात त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होते. या व्यक्तींचा दम्याचा आजार उपचारांनी बरा होत नाही. हे व्यसन करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या अंगातील स्टॅमिना कमी होण्याची शक्यता असते. या मुलांमध्ये फुफ्सुसाचे आजार आयुष्यभर राहतात.
नेमके काय होते?सिगारेट, विडी, ई-सिगारेट प्रकारांमुळे महिलांनाही फुफ्फुसाचे विविध आजार होत असतात. यामुळे महिलांमध्ये दम्याचे प्रमाण वाढू लागले आहे. या रुग्णांच्या श्वासात नायट्रिक ॲसिड आणि गॅसचे प्रमाण अधिक आढळून येते.
गर्भधारणा अन् स्तनपानावेळी...- स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. वरुणा पाठक यांनी सांगितले की, गर्भधारणेच्या काळात तसेच मुलांच्या स्तनपानावेळी धूम्रपान केल्याने मुलांच्या फुफ्फुसाचे तसेच शरीराचे मोठे नुकसान होते. - ज्या घरांमध्ये धूम्रपान केले जाते तेथील मुले सतत आजारी असतात. त्यामुळे मुले सोबत असतील तेव्हा धूम्रपान करणे टाळले पाहिजे.