हैदराबाद : अल्पवयीन मुलांनी वाहने चालविण्याचे प्रमाण देशभर वाढत आहे. हैदराबाद वाहतूक पोलिसांनी यंदा मार्च महिना ते २३ एप्रिल या कालावधीत अशा प्रकारचे २७३ गुन्हे नोंदविले असून, २६ अल्पवयीन मुलांच्या पालकांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याची परवानगी दिल्याबद्दल मार्च महिन्यामध्ये २० तर २३ एप्रिलपर्यंत ६ पालकांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. एवढेच नाही, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये अशाच एका प्रकरणात अल्पवयीन मुलालाही न्यायालयाने कारावासात धाडले आहे.हैदराबादचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक शाखा) अनिलकुमार यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांनी केलेल्या वाहन अपघातांचे प्रमाण वाढत असून, त्याला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. अल्पवयीन वाहनचालकांना पकडण्यासाठी वाहतूक पोलीस शहरामध्ये आठवड्यातून एकदा किंवा दोनदा विशेष तपासणी मोहीम राबवत आहेत. हैदराबादमध्ये अल्पवयीन वाहनचालकांवर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांंचे प्रमाण २०१६च्या तुलनेत २०१७ साली ३२ टक्क्यांनी वाढले आहे. मुलींचाही समावेशमध्यंतरी एका अल्पवयीन मुलीलाही कार चालविताना पोलिसांनी अडविले होते. ती एका पोलीस अधिकाऱ्याचीच मुलगी होती. तिच्यासोबत तीन अल्पवयीन मैत्रिणीही होत्या. त्यांनी मद्यपान केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, वाहन चालविणाºया मुलीने मद्यपान केले नव्हते, असे सांगण्यात आले. त्यांच्यातील एक मुलगी मात्र दारूच्या नशेत होती.
मुलाचा गुन्हा, शिक्षा मात्र मिळाली पालकांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:47 AM