गुवाहाटी : तीन वर्षांच्या मुलाचा नरबळी द्यायचा शनिवारी प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी आसामाच्या उदालगिरी जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सात जणांना ताब्यात घेऊन मुलाची सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी शाळेत विज्ञानाचे शिक्षक असलेले जदाब सहारिया हे सकाळी कलसीपारमधील घरी विधी करीत होते. हे विधी नरबळी द्यायच्या तयारीचे होते, असा आरोप आहे. दुपारी १२ च्या सुमारास आम्हाला त्याची माहिती समजली. त्या ठिकाणी आम्ही पोहोचल्यावर तेथे तीन महिला, चार पुरुष आणि मुलगा आढळले. हे सगळे लोक मंदिरात काही विधी करीत होते, असे भेरगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी निर्मल घोष यांनी सांगितले.
पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर ते हिंसक झाले आणि त्यांनी तेथे आलेले शेजारी, पत्रकार आणि पोलिसांच्या तुकडीवर दगडांनी हल्ला करायला सुरुवात केली. आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबार केला; परंतु ते प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे आम्ही त्यांच्या पायांवर गोळ्या झाडल्या, असे पोलीस म्हणाले. गोळीबारात सहारिया, त्यांचा मुलगा व एक नातेवाईक जखमी झाला. त्यांना गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे घोष म्हणाले. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार ते विधी जवळपास पाच तास सुरू होते आणि त्या कुटुंबाने त्यांचाच नातेवाईक असलेल्या मुलाचा बळी द्यायची तयारी सुरू केली होती.मुलाचे पालकच सहभागीया मुलाचे पालकच या विधीत सहभागी होते. कुटुंबाने त्यांचे घर जाळून टाकले. मोटारसायकल पेटवून दिली व स्वत:च्याच कारची नासधूस केली. सध्या आम्ही त्या कुटुंबाच्या सदस्यांना अटक केलेली नाही.ते ताब्यात असून त्यांची चौकशी केली जात असल्याचे घोष म्हणाले. या कुटुंबातील एकाने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केल्यानंतर हे कुटुंब एका तांत्रिकाच्या प्रभावाखाली आले. हा तांत्रिकही या विधींच्या वेळी उपस्थित होता.