चिमुकल्या श्रृतीची ब्लड कॅन्सरशी झुंज
By admin | Published: September 10, 2015 4:46 PM
फोटो-स्कॅन
फोटो-स्कॅनपरिस्थितीमुळे उपचारात अडचण : हवाय मदतीचा हात नागपूर : जीवन म्हणजे काय हे कळण्याइतपतही तिचे वय नाही. खेळणे, बागडणे, स्वप्न बघणे, हट्ट करणारे तिचे वय. या वयात तिला ब्लड कॅन्सरसारख्या भयंकर आजाराने विळखा घातला. नेमके आपल्याला काय झालेय हेही तिला सांगता येत नाही. मात्र तिच्या आजाराची पुष्टी झाल्यापासून आई-वडिलांच्या डोळ्यातून अश्रू थांबता थांबत नाही. ती निरासग आईच्या डोळ्यातील अश्रू बघून, अस्वस्थ होत आहे. आजाराची तिला कल्पना नाही. मला दवाखान्यात कशाला ठेवले आहे, मला घरी जायचे आहे, असा हट्ट तिचा सतत सुरू आहे. तिकडे आई-वडिलांची तिच्या उपचारासाठी धडपड सुरू आहे. मात्र परिस्थितीअभावी तेही हतबल ठरत आहे. या चिमुकलीचे नाव श्रृती प्रेम बागडे आहे. श्रृती परांजपे शाळेत चवथ्या वर्गात शिकते. श्रृतीचे वडील हातमजुरी करतात. आई चार घरी काम करून, कुटुंबाला हातभार लावते. कालपर्यंत श्रृती सामान्य मुलींसारखीच होती. खोडकर, हसरी, आईवडिलांकडे हट्ट धरणारी, अभ्यासतही ती हुशार. त्यामुळे आईवडिलांबरोबरच, शिक्षक आणि शेजारच्यांचीही ती लाडकी. आठवड्याभरापूर्वी श्रृतीला ताप आला. ताप काही कमी होत नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी रक्ताची तपासणी करण्यास सांगितले. यात तिला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. यावर आई-वडिलांचा विश्वासच बसत नव्हता, त्यामुळे पुन्हा त्यांनी रक्ताची तपासणी केली. त्यातही कर्करोगच निष्पन्न झाला. आणि तिच्या आई-वडिलांना जबर धक्काच बसला. काही हितचिंतकांच्या मदतीने तिच्यावर डॉ. अविनाश पोफळी यांच्या रुग्णालयात पुढच्या उपचाराच्या तपासण्या सुरू झाल्या. डॉक्टरांनी तिच्या उपचारावर तीन लाख रुपये खर्च येईल असे सांगितल्यावर ते अस्वस्थ झाले. मात्र पोरीला जगवायचे आहे, यासाठी पैशाची जुळवाजुळव करू लागले. एवढी मोठी रक्कम उभारणे त्यांना अवघड जात आहे. अनेकांकडे त्यांनी मदतीसाठी हात पुढे केले आहे. अद्यापतरी निराशाच आली आहे. :::चौकट:::श्रृतीला जगविण्यासाठी हवेय आर्थिक बळया चिमुकलीला जगविण्यासाठी, तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तिला झालेल्या आजाराबद्दल हळहळ व्यक्त करण्यापेक्षा, मदतीचा हात दिल्यास, या चिमुकलीला जगविण्याचे समाधान आपल्याला मिळले. तिला मदत करायची इच्छा असणाऱ्यांनी बँक ऑफ इंडियाच्या शंकरनगर शाखेत ८७०२१०४१०००००११ या क्रमांकाच्या खात्यात मदत करू शकता. अथवा ९६५७७९००५३ या मोबाईल क्रमांकावरही संपर्क साधू शकता.