ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 6 - उत्तर प्रदेश पोलिसांनी माकडांसोबत राहणा-या एका मुलीची सुटका केली आहे. या मुलीचं वय फक्त आठ वर्ष आहे. विशेष म्हणजे ही मुलगी पुर्णपणे माकडांप्रमाणेच वागत असून तिला माणसांची भीती वाटत आहे. बहारिच येथे माकडांच्या टोळीसोबत ही मुलगी राहत होती. पोलिसांनी तिची सुटका केली आहे.
पोलीस उप-निरीक्षक सुरेश यादव नेहमीप्रमाणे पेट्रोलिंग करत असताना कतरनी घाट अभयारण्याच्या मोतीपूर रेंजमध्ये ही मुलगी त्यांना आढळली. विशेष म्हणजे आजुबाजूला माकडांची टोळी असतानाही ही मुलगी त्यांच्यामध्ये अत्यंत शांतपणे बसली होती. तिला कोणता त्रास होत आहे असं अजिबात जाणवत नव्हतं. सुरेश यादव यांनी या मुलीची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता माकडांनी जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. फक्त माकडंच नाही तर मुलीनेही पोलिसांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली.
अथक प्रयत्न केल्यानंतर अखेर पोलिसांना या मुलीची सुटका करण्यात यश मिळालं. पोलिसांनी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे.
या मुलीला कोणत्याही भाषेचं ज्ञान नसून, तिला बोलताही येत नाही आणि समजतही नाही. माणसांना पाहिलं की ती घाबरते. तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी मधेच ती हिंसक होते असं सांगितलं आहे.
उपचाराला सुरुवात झाल्यानंतर तिच्यात सुधारणा होत आहे, मात्र गती खूपच कमी आहे. अजूनही ती प्राण्यांप्रमाणे सरळ तोंडाने खात आहे. चालतानाही माकडाप्रमाणे ती हात आणि पायाचा वापर करत आहे. तिला पायावर चालण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे.