नवी दिल्ली : सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रात भारत लवकरच मोठे पाऊल उचलणार असून, आपली पहिली ‘मेड इन इंडिया चिप’ याच वर्षी बाजारात येईल, अशी माहिती केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
स्वदेशी चिप ही भारताची मोठी कामगिरी असेल. चिप उत्पादनात सध्या चीन, अमेरिका, जपान आणि व्हिएतनाम यांचा दबदबा आहे. भारतही आता या स्पर्धेत उतरत आहे. ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’मध्ये आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या क्षेत्रास मजबूत करण्यासाठी सरकार जलद गतीने पावले उचलत आहे. आयटी मंत्र्यांनी म्हटले की, भारत केवळ चिप निर्मितीपुरताच मर्यादित राहू इच्छित नाही. त्यापुढील टप्प्यात मटेरिअल मॅन्यूफॅक्चरिंग, डिझाईन आणि इक्विपमेंट यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सेमिकंडक्टर उत्पादनामुळे देशाला तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबी बनता येईल तसेच अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल.
१० महिन्यांत येणार भारताचे एआय मॉडेल
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातही भारत गतीने काम करीत आहे. एआय तंत्रज्ञानासाठी भारत ठोस रणनीती आखत आहे. आगामी १० महिन्यांत भारत आपले ‘एआय’ मॉडेल विकसित करणार आहे.
मस्क यांचा शक्तिशाली एआय चॅटबॉट ‘ग्रॉक ३’
टेक्सास : उद्योगपती इलाॅन मस्क यांची स्टार्टअप कंपनी ‘एक्सएआय’चा नवा एआय चॅटबॉट ‘ग्रॉक ३’ मंगळवारी लाँच होणार असून हा जगातील सर्वाधिक शक्तिशाली चॅटबॉट असणार आहे. हा चॅटबॉट अमेरिकी वेळेनुसार सोमवारी रात्री ८.०० वाजता, तर भारतीय प्रमाण वेळेनुसार तो मंगळवारी सकाळी ९.३० वाजता लाँच होईल.