वॉशिंग्टन: लोकसंख्येच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या चीन आणि भारतामध्ये विकास वेगानं सुरू असल्यानं त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो, अशी जगाची धारणा आहे. मात्र या समजुतीला छेद देणारा एक अहवाल समोर आला आहे. वृक्षारोपणात भारत आणि चीन आघाडीवर असल्याचं आकडेवारीतून सिद्ध झालं आहे. विशेष म्हणजे हा अहवाल प्रतिष्ठीत अशा नासा या संस्थेनं दिला आहे. नासानं उपग्रहांच्या माध्यमातून जगभरातील देशांमध्ये असलेल्या वृक्षांची संख्या विचारात घेतली. त्यात भारत आणि चीन झाडं लावण्यात अव्वल असल्याचं दिसून आलं. जगातील एकूण झाडांचा विचार केल्यास, त्यातील एक-तृतीयांश वृक्षवल्ली चीन आणि भारतात असल्याचं अहवालाचं लेखन करणाऱ्या ची. चेन यांनी सांगितलं. मात्र पृथ्वीवरील जंगलांचा विचार केल्यास आकडेवारी नेमकी उलट आहे. जगातील एकूण वनक्षेत्राचा विचार केल्यास, त्यातील केवळ 9 टक्के क्षेत्र भारत आणि चीनमध्ये असल्याचं चेन सांगतात. भारत आणि चीनमध्ये वेगानं शहरीकरण सुरू आहे. त्यामुळे झाडांवर कुऱ्हाड पडते आहे. मात्र तरीही हेच दोन देश वृक्ष लावण्यात अग्रेसर असल्याचं दिसून येतं. ही बाब आश्चर्यजनक असल्याचं बोस्टन विद्यापीठाच्या चेन यांनी म्हटलं.नेचर सस्टेनेबिलिटी मासिकात सोमवारी एक लेख प्रसिद्ध झाला. त्यामध्ये नासाच्या अहवालाची माहिती आहे. नासाच्या उपग्रहांनी गेल्या काही वर्षातील (2000 ते 2017) वृक्ष लागवडीचा वेग आणि प्रमाण टिपलं. त्याचं विश्लेषण करण्यात आलं. त्यात भारत आणि चीन वृक्ष लावण्यात आघाडीवर असल्याचं दिसून आलं. चीनमधील 42 टक्के क्षेत्र वन जमिनीखाली आहे. तर 32 टक्के भागात शेती केली जाते. त्यामुळे चीन हिरवागार आहे. मात्र भारताच्या बाबतीत हीच बाब नेमकी उलट आहे. भारतात तब्बल 82 टक्के जमिनीवर शेती केली जाते. मात्र भारतातील वनक्षेत्राचं प्रमाण केवळ 4.4 टक्के इतकंच आहे. वायू, जल, जमिनीवरील प्रदूषण रोखण्यासाठी चीननं महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या अंतर्गत चीननं प्रदूषण कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम चीनमध्ये पाहायला मिळत आहेत.
एकच नंबर! झाडं लावण्यात भारत, चीन अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 5:05 PM