लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: अरुणाचलमधील सीमावादावरून चीनबरोबर १७व्या चर्चेच्या फेरीनंतर चीनला हा तणाव कमी करण्यात रस नसल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे दोन्ही बाजूंकडील सैन्य अगदी जवळ एकमेकांसमोर उभे असल्याचे चित्र आहे. चीनचे सैन्य अगदी हाकेच्या अंतरावर आहे.
गृहमंत्रालय आणि सुरक्षा मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, यंदाच्या हिवाळ्यात चीनचे २ लाख सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) तैनात आहेत. भारतीय सेना आणि आईबीपीचे एवढेच जवान तैनात आहेत. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रेही सीमेवर जमा केली आहेत. भारताने नुकतेच १७ उच्च रिझॉल्युशनचे कॅमेरे खरेदीचीही ऑर्डर दिली आहे. हे कॅमेरे आयटीबीपीला देण्यात येणार असून, चीनवर नजर ठेवण्यात येईल.
अंतर केवळ ५०० फुटांचे
सूत्रांचे म्हणणे आहे की, तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडील सैन्यातील अंतर अत्यंत कमी राहिले आहे. काही ठिकाणी तर चिनी सैन्य हाकेच्या अंतरावर म्हणजे ५०० फूट अंतरावर आहे.
१७ हजार फुटांवर अतिरिक्त सैनिक
आयटीबीपीने अरुणाचल प्रदेशातील वादग्रस्त भागांजवळ अतिरिक्त चौक्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यांगत्सेच्या १७ हजार फूट उंच शिखरावर अतिरिक्त सैन्य तैनात केले जाईल, जिथे चिनी सैनिकांनी घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. चीनच्या नौटंकी पाहता, आयटीबीपीचे ९० हजार जवान आधीच विविध क्षेत्रांत तैनात आहेत. विवादित सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी १९९७ नंतर भारतासोबत केलेले जवळपास सर्व करार चीनने धाब्यावर बसविले आहेत. यामध्ये २०१३ मध्ये झालेल्या समितीचा समावेश आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"