नवी दिल्ली : चीन ही भारतासमोरील पाकपेक्षा मोठी समस्या आहे, असे मत एका सर्वेक्षणात ६८ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. एबीपी-सीव्होटरच्या सर्व्हेमध्ये ७२.६ टक्के भारतीयांनी मोदी सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणावर विश्वास दाखवला आहे. गलवान व्हॅलीत चिनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला. तणाव निवळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी लष्करी स्तरावर चर्चा सुरू असून, संघषार्नंतर मतमतांतरे व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चीनसंदर्भात केंद्राच्या धोरणांविषयी हा सर्व्हे केला होता.२० जवान शहीद झाल्यानंतर मोदी सरकारने चीनला उत्तर देण्यासाठी ठोस पावले टाकली का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ३९ टक्के लोकांनी याला हो असे उत्तर दिले आहे. तर ६० टक्के लोकांचे उत्तर नाही असे आहे. चीनला अद्याप चोख प्रत्युत्तर मिळालेले नाही, असे या नागरिकांनी सर्व्हेमध्ये म्हटले आहे.सध्या चीनसोबत सीमेवरून सुरू असलेला संघर्ष हाताळण्यात मोदी सरकार सक्षम असून, ७३.६ टक्के भारतीयांनी सरकारवर विश्वास दाखवला आहे. विरोधी पक्षांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर विश्वास असल्याचं ७३.६ टक्के भारतीयांचे म्हणणे आहे. तर १६.७ टक्के भारतीयांनी हा मुद्दा हाताळण्यात विरोधक सक्षम असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचे म्हणजे ९.६ टक्के लोकांना चीनसोबतचा मुद्दा योग्य पद्धतीने हातळण्यात मोदी सरकार अथवा विरोधक दोन्ही पात्र नसल्याचे वाटते आहे.
चीन ही भारतासमोरील पाकपेक्षा मोठी समस्या, मोदी सरकारवर ७२.६ % भारतीयांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 4:18 AM