किबिथू (अरुणाचल प्रदेश) :
‘भारताच्या भूमीवर कोणीही अतिक्रमण करू शकत होता, तो काळ आता संपला आहे. आता कोणीही देशाच्या सीमेकडे पाहण्याची हिंमत करत नाही. लष्कर आणि भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या (आयटीबीपी) शौर्याने भारताच्या एका इंच जमिनीवर कोणीही अतिक्रमण करू शकत नाही,’ असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी कुरापतखोर चीनवर केला.
अरुणाचल प्रदेशातील किबिथू या गावात ‘व्हायब्रंट व्हिलेज’ कार्यक्रमाचे उद्घाटन करताना शाह यांनी पायाभूत सुविधा आणि इतर विकासकामांकडे लक्ष वेधले. शाह म्हणाले की, आमच्या जमिनीवर कोणीही अतिक्रमण करू शकत होता, तो काळ गेला आहे. आता सुईच्या टोकाएवढी जमीनही अतिक्रमण करता येणार नाही.१९६२च्या युद्धाची आठवण- १९६२च्या युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या किबिथूच्या शहिदांना श्रद्धांजली वाहताना शाह म्हणाले की, त्यांनी संसाधनांची कमतरता असतानाही अदम्य धैर्याने लढा दिला. येथे लोक ‘जय हिंद’ने एकमेकांना अभिवादन करतात, जे देशभक्तीच्या भावनेने आपले हृदय भरते. - पूर्वी सीमाभागातून परतणारे लोक भारतातील शेवटच्या टोकाच्या गावात गेल्याचे सांगत असत, परंतु मोदी सरकारने ते बदलले आहे. आता लोक म्हणतात की त्यांनी भारतातील पहिल्या गावात प्रवास केला आहे.
चीनला पोटदुखी, म्हणे शाह यांचा दौरा सार्वभौमत्वाचे उल्लंघनचीनने सोमवारी गृहमंत्री अमित शाह यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर टीका करत या भागावरील चीनच्या सार्वभौमत्वाचे त्यांनी उल्लंघन केल्याचा दावा केला आहे. अरुणाचलमधील भूभागांवर आपला दावा बळकट करण्याच्या उद्देशाने चीनने भारताच्या सीमावर्ती राज्यातील काही ठिकाणांची नावे बदलण्याची कुरापत केली होती. चीनच्या या निर्णयाचा निषेध केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी चीनने शाह यांच्या दौऱ्याला विरोध केला.
गृहमंत्री शाह यांच्या दौऱ्यावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या तीव्र प्रतिक्रियेवर भारताकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी, अरुणाचल प्रदेशच्या आपल्या नेत्यांच्या भेटींवर चीनचे असे आक्षेप भारत नेहमीच फेटाळत आला आहे. शाह यांच्या भेटीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले, ‘झांगनान (अरुणाचल प्रदेशचे चिनी नाव) चीनचा भूभागाचा भाग आहे. झांगनानमधील भारतीय नेत्याची कृती चीनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचे उल्लंघन करते आणि सीमावर्ती भागात शांतता आणि शांतता राखण्यात बाधा आणते. आम्ही याच्या विरोधात ठाम आहोत.’