China Coronavirus : केरळमध्ये कोरोना व्हायरसची दहशत, सरकारकडून आपत्ती घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 11:12 PM2020-02-03T23:12:14+5:302020-02-03T23:12:35+5:30
केरळ सरकारनं कोरोना व्हायसरच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती जाहीर केली आहे.
तिरुवनंतपूरम: केरळ सरकारनं कोरोना व्हायसरच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती जाहीर केली आहे. कोरोनालाकेरळ सरकारनं राज्य आपत्ती घोषित केलेली असून, सर्वच जिल्ह्यांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. त्यामुळे केरळमधली सरकारी आणि आपत्कालीन यंत्रणा जागी झाली आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी सल्लामसलत करून ही घोषणा केली आहे. चीनच्या वुहान येथून आलेल्या लोकांची सरकारकडून एक यादी तयार केली जात आहे. त्यासाठी इमिग्रेशन डिपार्टमेंटशी संपर्क साधण्यात येणार असून, राज्यातील करोनाच्या प्रत्येक संशयित रुग्णांकडे लक्ष देण्यात येत आहे.
चीनमध्येकोरोना व्हायरसने थैमान घातलेलं असून, चीनमध्ये वेगाने व्हायरस पसरल्यानंतर भारत, अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये व्हायरससाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसमुळे 361 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तर 9692 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतात कोरोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. कोरोनाची लागण झालेला हा केरळमधील तिसरा रुग्ण सापडला होता.
चीनमधून भारतात परतलेल्या पाच नागरिकांमध्ये कोरोना वायरस संक्रमण झाल्याची लक्षणं आढळून आली आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्या पाचही जणांमध्ये खोकला आणि सर्दीची लक्षणं दिसल्यानंतर उपचारासाठी हरिणायातल्या मानेसर स्थित क्वारंटाइन फॅसिलिटी बेसच्या हॉस्पिटल हलवलं आहे. त्या पाच रुग्णांच्या रक्ताचे नमुने दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसची लागण झालेली असल्यास सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होण्यासारखे प्रकार नजरेस पडतात.
फिलिपिन्समध्ये कोरोना व्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. कोरोना व्हायरसनंतर आता चीनला बर्ड फ्लूचा धोका आहे. एका पोल्ट्री फार्ममधील तब्बल 4500 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हुनान प्रांतातील शुआंगक्विंग जिल्ह्यात एकाचवेळी हजारो कोंबड्याचा मृत्यू झाल्याने बर्ड फ्लू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोंबड्यांचा मृत्यू झाला असला तरी अद्याप कोणत्याही व्यक्तीमध्ये एच5एन1 हे व्हायरस आढळले नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. हुबेई प्रांतच्या स्थानिक आरोग्य विभागाने सोमवारी याची माहिती दिली आहे.