नवी दिल्ली : चीनने लडाखच्या सीमेवर क्षेपणास्त्रे तैनात केली असून रडार यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मात्र चीनला चोख उत्तर देण्यास भारत सक्षम आहे, असे हवाई दलाचे प्रमुख राकेशकुमार सिंह भदौरिया यांनी सांगितले.
विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनने आयोजिलेल्या एका ऑनलाईन परिसंवादात ते म्हणाले की, चीनने भारताशी कोणत्याही प्रकारे संघर्षाची भूमिका घेऊ नये. चीनने लष्कराच्या बळावर केलेले कोणतेही दु:साहस त्याच देशाला महागात पडू शकते. चीनने जमिनीवरून जमिनीवर तसेच जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्रे लडाख सीमेवर तैनात केली आहेत. मात्र भारत कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे.
भदौरिया यांनी सांगितले की, कोरोनाच्या साथीच्या काळात चीनची विश्वासार्हता कमी झाली आहे. जगभरात असलेले अमेरिकेचे वर्चस्व कमी करण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भारतासमोरील संरक्षणविषयक प्रश्न गंभीर स्वरूप धारण करू शकतात. चीनच्या बदलत्या पवित्र्याची भारताने गंभीर दखल घेतली आहे.
पश्चिम आशियातील घडामोडीही चिंताजनक
भारतीय हवाई दलाचे प्रमुख राकेशकुमार सिंह भदौरिया म्हणाले की, पाकिस्तान, इराण, तुर्कस्तान या देशांत होत असलेली लष्करी देवाणघेवाण व पश्चिम आशियातील घडामोडींमुळे भारतासमोर सुरक्षेचे प्रश्न उभे राहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला अत्यंत सतर्क राहावे लागेल.