India vs China: गेल्या अनेक महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यातला लढा सुरू आहे. यातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. चीननेलडाखमधील डेमचोक येथे असलेला ऐतिहासिक 'जोरावर' किल्ला उद्ध्वस्त केला आहे. आता ते या ठिकाणी त्यांचे निरीक्षण केंद्र उभारत आहेत.लडाखमधील चुशूलचे काउंसिलर कोंचोक स्टेजिन यांनी हा दावा केला आहे. त्यांनी ट्विटरवर एक फोटोदेखील शेअर केला आहे.
हा ऐतिहासिक किल्ला जिथे आहे, तिथे चीनने पायाभूत सुविधा वाढवल्याचा दावा स्टेजिन यांनी केला आहे. त्यावर चीनकडून सातत्याने कामही सुरू आहे. यासोबतच असेही सांगण्यात येत आहे की, या ठिकाणी चीनने सीमेला लागून काही डमी गावंदेखील बनवली आहेत. या गावांचा वापर करुन चीन आपली सीमा वाढवू पाहत आहे. या डमी गावांच्या बातम्या यापूर्वीही अनेकदा समोर आल्या आहेत. स्टेजिन यांनीदेखील अनेकदा या गावांचे फोटो शेअर केले आहे.
ते पुढे म्हणतात की, आपला देश एलएसीवरील सद्य परिस्थितीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ आहे. तिथली खरी परिस्थिती सर्वांना कळावी, अशी त्यांची इच्छा आहे. यासोबतच सरकारनेही याकडे लक्ष देऊन आवश्यक ती पावले उचलली पाहिजे, असेही ते म्हणाले. याआधीही त्यांनी एलएसीभोवती चीनच्या कारवायांबाबत माहिती दिली आहे. सीमेला लागून असलेल्या भागात चीनने 3 मोबाईल टॉवर बसवले असल्याचे त्यांनी यापूर्वी सांगितले होते. याची माहितीही त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.
सीमेवर भारतीय लष्कराचा चीनी सैनिकांशी सामना सुरुच आहे. यापूर्वी तवांग सेक्टर आणि गलवान व्हॅलीमध्येही चीनने भारताच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय लडाखच्या अनेक भागांवर चीनची नजर आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चीनशी झालेल्या संघर्षानंतर स्थानिक परिस्थिती आणखी गंभीर झाली होती. यानंतर लडाखच्या काही भागात स्थानिक लोकांना तिथे जाण्यास मनाई करण्यात आल्याच्या बातम्या आल्या.