बीजिंग: भारतासोबत असलेल्या सीमावादात कुरघोडी करण्यासाठी चीन वेगळीच चाल खेळला आहे. चीननं हिमालयाच्या कुशीत ६२४ गावं वसवली आहेत. वादग्रस्त सीमेच्या आत किंवा बळकावलेल्या भागात चीननं गाव वसवल्याचं बोललं जात आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आदेशानंतर २०१७ मध्ये या गावांचं काम सुरू झालं होतं.
चिनी सरकारनं २०२१ मध्ये गावांचं बांधकाम पूर्ण केल्याची माहिती संरक्षणतज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी चीन सरकारचं संकेतस्थळ असलेल्या तिबेट डॉट सीएनच्या हवाल्यानं दिली आहे. भारतात निवडणुका आणि अंतर्गत राजकारण सुरू असताना चीननं भारताला लागून असलेल्या सीमेवर ६२४ गावं वसवली. तिबेटीमधील गुराख्यांना सीमेवर वसवण्यात यावं असे आदेश चिनी अध्यक्षांनी २०१७ मध्ये दिले होते.
तिबेटमध्ये उभारण्यात आलेल्या गावांमध्ये वीज, इंटरनेट, पाणी आणि पक्के रस्ते बांधण्यात आल्याचा दावा चीननं केला आहे. सोयी सुविधा आल्यानं या भागात समृद्धी, स्थिरता आल्याचं चीननं सांगितलं. या गावांना पॉवर ग्रीडनं जोडण्यात आलं आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत सुरू आहे.
चीननं उभारलेली ६२४ गावं बरीच दूर आहेत. तिथली परिस्थिती राहण्यासाठी फारशी अनुकूल नाही. त्यामुळे चिनी सरकार विविध प्रकारच्या सुविधा देऊन सीमावर्ती भागात स्थायिक होण्यासाठी प्रयत्न करत आहे. इथे राहण्यास येणाऱ्या लोकांना वर्षाकाठी ३० हजार युआन दिले जात असल्याचं वृत्त तिबेट डेलीनं दिलं आहे. भारतीय चलनात बोलायचं झाल्यास ही रक्कम साडे तीन लाखांच्या घरात जाते.