नवी दिल्ली : एकीकडे चीन भारताशी शांततेच्या चर्चेचे नाटक करत दुसरीकडे अक्साई चीनमध्ये तब्बल ११ बोगदे बांधत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. नुकतेच चीनने आपल्या नकाशात भारताचा भूभाग दाखवण्याची खोड केली होती.
वादग्रस्त अक्साई चीनमध्ये चीन बोगदे बांधत असल्याचे मॅक्सर या आंतरराष्ट्रीय भू-गुप्तचर उपग्रहाच्या छायाचित्रांतून दिसते. ६ डिसेंबर २०२१ नंतर आता १८ ऑगस्ट २०२३ पर्यंत येथे मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यात आले आहे.
मूर्खपणाचे दावे केल्याने इतरांचा भाग आपला बनत नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला सुनावले, तर पंतप्रधानांनी यावर बोलायला हवे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
नव्या नकाशाचे चीनकडून समर्थनचिनी कायद्यांनुसार नवा नकाशा आहे. या नकाशाबाबत भारताने आततायी नव्हे, तर वस्तुनिष्ठ भूमिका घ्यावी, असे चीनने म्हटले आहे.
उपग्रह प्रतिमांमध्ये ४ नवीन बंकर१८ ऑगस्टच्या उपग्रह प्रतिमा दरीच्या बाजूला चार नवीन बंकर बांधल्याचे सूचित करतात. तसेच प्रत्येक जागेवर आणखी दोन ते पाच पोर्टल्स किंवा बोगदे आहेत, ज्यात ३ बोगदे टेकडीवर बांधले जात आहेत. अनेक ठिकाणी अवजड यंत्रसामग्रीही दिसत आहे.
ही चीनची जुनी सवय आहे. फक्त भारताच्या काही भागांसह नकाशे तयार केल्याने काहीही बदलत नाही. कोणता भूभाग आपला आहे, हे सरकारला ठाऊक आहे. मूर्खपणाचे दावे करून इतरांचा भूभाग आपला होत नाही. - एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री
पंतप्रधान म्हणाले होते, लडाखमध्ये एक इंचही जमीन गेली नाही. हे उघड खोटे आहे. चीनने भारताची जमीन त्यांच्या नकाशात दाखवणे हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. चीनने भारताची जमीन आधीच बळकावली आहे. - राहुल गांधी, काँग्रेस नेते