ऑनलाइन लोकमत
बर्लिन, दि. 1 - युरोपमध्ये भारतासाठी जर्मनी जवळचा सहकारी देश असला तरी, जर्मनीसाठी मात्र भारतापेक्षा चीन जास्त महत्वाचा आहे. जर्मनीचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पेनसाठी रवान होताच चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांची भेट घेतली. चीन आमच्यासाठी आर्थिक आणि व्यापारी दुष्टीकोनातून महत्वपूर्ण देश आहे असे जर्मनीच्या अधिका-यांनी सांगितले. युरोपच्या बाहेर चीन जर्मनीचा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. पण अर्थव्यवस्थेच्या पलीकडे चीनची व्यापारी धोरणे आणि ओबीओआर प्रकल्पाच्या विस्ताराबद्दल जर्मनी सावध आहे.
भारताने योग्यवेळी जर्मनीबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी पावले उचलली असली तरी, जर्मनीच्या दृष्टीकोनातून अजूनही भारतापेक्षा चीन जास्त महत्वाचा आहे. चीनी पंतप्रधानांच्या दौ-याला जर्मन मीडियामध्ये जितकी प्रसिद्धी मिळाली त्या तुलनेत मोदींच्या दौ-याला तेवढे कव्हरेज मिळाले नाही असे निरीक्षकांनी सांगितले. जर्मनीनेही भारताबरोबरचे संबंध बळकट करण्याकडे लक्ष दिले आहे. पण यापेक्षाही जर्मनीने जास्त प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने वेगळा आशिया-पॅसिफिक विभाग सुरु केला आहे. भारत आणि चीन या दोन देशांबरोबरच्या संबंध दृढ करण्यावर या विभागाचा भर असेल असे जाणकरांनी सांगितले.
आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर भारत-जर्मनी किंवा भारत-युरोप संबंधाचे भवितव्य अवलंबून असेल. अमेरिकेबरोबर दुरावा वाढल्यानंतर जर्मनीच्या भूमिकेत बदल झाल्याचे दिसत आहे. आपण दुस-यांवर पूर्णपणे अवलंबून रहायचो तो काळ आत मागे पडलाय. मागच्या काही दिवसांपासून मी हाच अनुभव घेतेय असे मर्केल रविवारी एका निवडणूक प्रचारसभेत बोलताना म्हणाल्या. मर्केल यांनी अप्रत्यक्षपणे इंग्लंड आणि अमेरिकेवर टीका केली होती.
चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीतून आशियाई देशांबरोबरचे संबंध अधिक भक्कम करण्यावर भर दिल्याचे संकेत जर्मनीने दिले होते. 2016 मध्ये भारत आणि जर्मनीमध्ये 17.42 अब्ज डॉलरचा व्यवहार झाला. या दौ-यात जर्मनीमधल्या छोटया आणि मध्यम उद्योग कंपन्यांना भारताच्या मेक इन इंडिया प्रोजेक्टमध्ये जोडण्याचा मोदींनी प्रयत्न केला. आर्थिक संबंध विकसित करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत. मी या भागीदारीसाठी खूप आशावादी आहे असे मोदींनी सांगितले.