नवी दिल्ली: चिनी सैन्याकडून गेल्या महिन्यात तीनवेळा घुसखोरी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंडो तिबेटियन पोलीस दलाच्या (आयटीबीपी) एका अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. चिनी सैन्य भारतीय हद्दीत तब्बल चार किलोमीटरपर्यंत घुसलं होतं, अशी धक्कादायक माहिती या अहवालात आहे. चिनी सैन्यानं उत्तराखंडच्या बाराहोती भागात 6 ऑगस्टला घुसखोरी केली होती. यानंतर 14 आणि 15 ऑगस्टलादेखील चिनी सैन्यानं सीमा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला. चीनचं सैन्य आणि काही नागरिक बाराहोतीच्या रिमखिम पोस्टपर्यंत पोहोचले होते. चिनी सैन्यानं 4 किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली होती. संपूर्ण देशात ज्यावेळी स्वातंत्र्य दिन साजरा केला जात होता, त्यावेळी चिनी सैनिक भारतीय हद्दीत होते. यानंतर आयटीबीपीच्या जवानांनी चिनी सैन्याला विरोध करत त्यांना अडवलं. त्यामुळे चिनी सैन्यानं माघार घेतली आणि नागरिकांसह पुन्हा सीमेच्या दिशेनं वाटचाल सुरू केली.
ड्रॅगनच्या कुरापती सुरूच; ऑगस्टमध्ये तीनवेळा घुसखोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 10:03 AM