ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - काश्मीर हा भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्न आहे. तसेच उभयपक्षी चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याची भारताची भूमिका आहे. त्यामुळे चीनने काश्मीर प्रश्नात नाक खुपसायची गरज नाही, असे सांगत भारताने काश्मीर प्रश्नी विधायक भूमिका घेण्याचा चीनचा प्रस्ताव फेटाळून लावला.
"पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चौकटीत चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत," असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया हा या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा असेल, असेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले.
"भारत आणि पाकिस्तान हे दक्षिण आशियातील महत्त्वाचे देश आहेत. पण काश्मीरमधील परिस्थितीमुळे जागतिक समुदायाचे त्यांच्याकडे लक्ष वेधले जात आहे,"असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग म्हणाले होते. भारत आणि पाकिस्तानमधील बिघडलेल्या संबंधांबाबत चिंता व्यक्त करताना शुआंग म्हणाले की, "काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या तणावामुळे दोन्ही देशांमधील शांतता आणि स्थैर्याला धोका पोहोचू शकतो. तसेच दोन्ही देशातील बिघडलेल्या संबंधांमुळे या प्रदेशातील शांतताही धोक्यात येऊ शकते." आणखी वाचा
( चीनचा सामना करण्यासाठी भारत तयार करतोय खास मिसाईल )( चीनची ऎतिहासिक सैन्यकपात, हा आहे ड्रॅगनचा नवा प्लॅन )( भारत -चीन सीमा वाद का ताणला जातोय? )त्याआधी पाकिस्तानने हस्तक्षेपाची विनंती केल्यास पाकिस्तानच्या दिशेने तिसऱ्या देशाचे सैन्य काश्मिरात घुसखोरी करू शकते, असा इशारा देत आम्हीच तेथून काश्मीरमध्ये घुसू, असे चीनच्या सरकारी माध्यमांनी सूचित केले होते. सिक्किमजवळील डोकलामच्या मुद्द्यावरून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच चीनने प्रथमच या वादात काश्मीरमध्ये घुसण्याची अप्रत्यक्ष भाषा सुरू केली होती. चीनने तिसऱ्या देशाचे सैन्य असा उल्लेख केला असला तरी त्या देशाची स्वत:च तिथून काश्मिरात घुसण्याची तयारी असल्याचे मानले जाते.
एकीकडे भारत व पाकिस्तान संबंध तणावाचे आहेत आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सातत्याने पाकिस्तानी लष्कर भारताच्या दिशेने गोळीबार व तोफांचे मारे करीत आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात घुसण्यास मदत करणे आणि काश्मीरमधील अतिरेक्यांना सततची मदत हाही पाकिस्तानच्या कारवायांचा भाग आहे. त्यातच भारत व अमेरिका संबंध वृद्धिंगत होत असल्याने पाकिस्तान व चीन दोघेही अस्वस्थ आहेत. पाकमधील अनेक प्रकल्पांमध्ये सध्या चीनची गुंतवणूक असून, हे दोन्ही देश आता मित्रच बनले आहेत.