नवी दिल्ली – गेल्या अनेक दिवसापासून भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढत चाललेला आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेजवळ तणाव निर्माण झाला. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीन आता एक नवीन डाव साधत आहे. चीनने फिंगर -४ क्षेत्रात एलएसीवर लाऊड स्पीकर बसवले आहेत. या लाऊडस्पीकरवर चीन पंजाबी गाणीही वाजवत आहे.
चीन आता लाऊडस्पीकरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार, चिनी सैन्याने फिंगर -४ क्षेत्रात लाऊडस्पीकर बसवले आहेत. चीनने ज्याठिकाणी हे लाऊडस्पीकर बसवले आहेत. तिथे २४ तास भारतीय जवानांचा पहारा असतो. त्यामुळे भारतीय सैन्याचं लक्ष विचलित करण्यासाठी चीनने अशाप्रकारची खेळी करत असल्याचं बोललं जात आहे. या ठिकाणी तैनात केलेल्या सैन्यात शिखांचा देखील समावेश आहे. पंजाबी गाणी वाजवून चिनी सैन्य या मानसिक दबाव टाकण्याची चाल आखत आहे.
फिंगर -४ क्षेत्र असे एक क्षेत्र आहे जेथे भारत आणि चीनच्या सैन्यात संघर्ष होण्याची परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी ८ सप्टेंबर रोजी दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये या भागात जोरदार गोळीबार झाला होता. दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये १०० हून अधिक राऊंड फायर करण्यात आल्या होत्या. गेल्या २० दिवसांत भारत आणि चीन यांच्या पूर्व लडाखमधील सैनिकांमध्ये किमान तीन वेळा गोळीबारांच्या घटना घडल्या आहेत.
लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २९-३० ऑगस्ट दरम्यान दक्षिणेकडील पँगॉग तलावानजीक उंच पठारावार कब्जा करण्याचा चीनचा प्रयत्न फसला. दुसरी घटना ७ सप्टेंबर रोजी मुखापरी जवळ घडली. तिसरी घटना ८ सप्टेंबर रोजी पँगॉग तलावाच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ घडली. त्या काळात दोन्ही देशांच्या सैनिकांनी १०० हून अधिक राऊंड फायर केले.
ही घटना त्यावेळी घडली जेव्हा शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी भारतीय परराष्ट्रमंत्री मॉस्कोला गेले होते. तिथे सीमाप्रश्नावर चीनच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. चर्चेनुसार दोन्ही बाजूंनी मुख्य कमांडर-स्तरीय चर्चेचे आयोजन केले होते, परंतु अद्याप चीनने तारीख व वेळ निश्चित केली नाही. भारत आणि चीनमध्ये एप्रिल, मे या दोन महिन्यांत लष्करी व मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पाडल्या आहेत, परंतु अद्यापपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. चीनच्या सैन्याने पँगॉग लेक जवळील कांगारंग नाला, गोगरा आणि फिंगर क्षेत्रात केलेल्या बदलांनंतर भारताने त्यास विरोध केला. तेव्हापासून चीन आणि भारत यांच्यातील तणाव वाढला आहे.
...अन्यथा युद्धासाठी तयार राहा, चीनची भारताला धमकी
चिनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचे संपादक हू शिजिन म्हणाले की, चिनी सैन्य भारतीय टँक नष्ट करण्याचा सराव करीत आहे. मॉस्कोमध्ये परराष्ट्र मंत्र्यांमधील पाच कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी भारत सरकारने केली नाही, तर चिनी सैन्य भारताला योग्य उत्तर देण्यास तयार आहे, अशी धमकी त्यांनी दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिलेल्या विधानानंतर चीनला आणखीनच भडकला आहे. चिनी सैन्याच्या दबावामुळे भारतीय लष्कर नरमाईच्या भूमिकेत आलं आहे, असा दावा शिजीन यांनी केला. ते म्हणाले की, पीएनए पँगॉग तलावाजवळ भारत-चीन सीमेवर निर्णायक कारवाईसाठी तैनाती वाढवित आहे. बीजिंग चीन-भारत सीमा विवाद शांततेने सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु त्यांनी आपले सैन्य सज्ज ठेवले आहे.
'चिनी सैन्य हिवाळ्यापर्यंत गतिरोध सुरू ठेवण्यास सज्ज'
दुसरीकडे ग्लोबल टाइम्सने तज्ज्ञांचा हवाला देत असे म्हटले आहे की, भारत कठोर भूमिका स्वीकारत आहे आणि येत्या थोड्या महिन्यात या दोघांमधील तणाव कायम राहू शकतो. चिनी सैन्याने हिवाळ्याच्या हंगामापर्यंत गतिरोध सुरू ठेवण्यास तयार राहावे. भारत आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांमधील पाच कलमी मुद्द्यांच्या करारानंतरही चीनचे अधिकृत प्रचार माध्यम भारताला धमकावण्यास आणि मानसिक दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.