सिंगापूरच्या भूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सांगितल्याबद्दल परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला जोरदार फटकारलं. भारत पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांमध्ये दहशतवादाकडे कधीही दुर्लक्ष करू शकत नाही, असंही जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितलं. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तीन दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर आहेत. येथे ते युद्ध स्मारकावर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना श्रद्धांजली वाहतील.
अरुणाचलवरील दावा हास्यास्पद
अरुणाचल प्रदेशवरील चीनचे दावे सुरुवातीलाही हास्यास्पद होते आणि आजही हास्यास्पद आहेत, कारण तो भारताचा नैसर्गिक भूभाग आहे, असं म्हणत जयशंकर यांनी चीनला सडेतोड उत्तर दिलं. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरच्या (NUS) इन्स्टिट्यूट ऑफ साउथ एशियन स्टडीज (ISAS) येथे 'व्हाय इंडिया मॅटर्स' या पुस्तकावरील व्याख्यानानंतर आयोजित प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान जयशंकर यांनी यावर भाष्य केलं.
चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जयशंकर टिप्पणी आली आहे. अलीकडेच, चिनी लष्करानं अरुणाचल प्रदेश हा चीनचा नैसर्गिक भाग असल्याचं म्हटलं होतं. नंतर एका निवेदनात, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दावे खोडून काढले आणि अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं म्हटलं.
पाकिस्तानवरही हल्लाबोल
दरम्यान, यावेळी पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्याच्या मुद्द्यावरही जयशंकर यांनी भाष्य केलं. "पाकिस्तान आता जवळपास औद्योगिक स्तरावर दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. अशातच दहशतवादाकडे दुर्लक्ष करण्याच्या स्थितीत भारत नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादावर बोलताना, त्यांनी ही क्षणार्धात होणारी घटना नाही. ही निरंतर चालत राहते. त्या ते ठिकाणी जवळपास उद्योग स्तरावर सामील आहे. त्यामुळे धोक्याचा सामना करण्यासाठी एक पद्धत शोधावी लागणार असल्याच्या निष्कर्षावर आम्ही पोहोचलो आहोत, असंही जयशंकर यांनी नमूद केलं.
भारताला एक स्थिर शेजारी हवा आहे. दुसरं काही नाही तर तुम्हाला किमान शांततापूर्ण शेजारी हवा असतो, असं एका प्रश्नाला उत्तर देताना जयशंकर म्हणाले.