नवी दिल्ली : चीनने आमच्या अंतर्गत कामकाजात हस्तक्षेप करू नये, आम्ही ‘एक चीन’ धोरणाचा आदर करतो व चीननेही तशीच भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे, असे केंद्रीय गृहराज्य मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी म्हटले. दलाई लामा यांची अरुणाचल प्रदेशची भेट हीे धार्मिक असून तिला राजकीय हेतू चिकटवला जाऊ नये, असे ते म्हणाले. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य अंग आहे आणि चीनने त्यांच्या भेटीला आक्षेप घ्यायला नको व भारताच्या अंतर्गत कामकाजात हस्तक्षेप करू नये, असे रिजिजू म्हणाले. यापूर्वी दलाई लामा यांनी अरुणाचल प्रदेशला नोव्हेंबर २००९ मध्ये भेट दिली होती. वाईट हवामानामुळे दलाई लामांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल झाला आहे. आसामहून थेट तवांगला जाणे त्यांना मंगळवारी शक्य झाले नाही. ते वाहनाने अरुणाचललला पोहोचले असून, नंतर तवांगला जाणार आहेत. तवांग हा भाग दोन्ही देशांच्या सीमेवर असून, चीन सातत्याने त्यावर आपला दावा करीत आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>कृत्रिम वाद नकोदलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेशच्या भेटीवरून चीनने कोणताही कृत्रिम वाद निर्माण करू नये, असे भारताने मंगळवारी स्पष्ट केले. लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीला चीनने सातत्याने विरोध केला असून त्यामुळे द्विपक्षीय संबंध बिघडतील, असा इशाराही दिला होता. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की दलाई लामा हे आदरणीय धार्मिक नेते असून भारतात त्यांंना अतिशय मान आहे, असे आम्ही स्पष्ट केले आहे. त्यांच्या धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रमांना आणि भारताच्या वेगवेगळ््या राज्यांना भेटींना कोणताही रंग दिला जाऊ नये.
चीनने कामकाजात हस्तक्षेप करू नये: रिजिजू
By admin | Published: April 05, 2017 4:47 AM