ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - चीनच्या आक्रमकतेला ठेंगा दाखवत सिक्कीमच्या ज्या भागावर गेल्या 22 दिवसांपासून वाद सुरू आहे, त्याच भागात जाऊन भारतीय लष्कराने दिर्घकाळ तंबू गाडले आहेत. भारताने आपल्या सैनिकांना या भागातून परत बोलवावं अशी चीनची मागणी आहे. मात्र भारतीय सैन्याने माघार घेण्यास नकार देत तंबू ठोकले आहेत.
सिक्किम सेक्टरमधील जवळपास 10 हजार फूट उंचीवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. भारतीय सैन्याने मागे हटावे, यासाठी चीनकडून वारंवार इशारे देण्यात आले आहेत. मात्र तरीही भारतीय सैन्याचे जवान सिक्किम सेक्टरमध्ये पाय रोवून उभे आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे, भारतीय लष्कराच्या जवानांनी जवळपास 10 हजार फुट उंच या वादग्रस्त भागात तंबू गाडले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान तेथून सरकणार नाही, तोपर्यंत आपणही माघार घेणार नाही असा संकल्प या सैनिकांनी घेतला आहे. याशिवाय डोक्लाममधील भारतीय सैन्याला अविरतपणे रसद पुरवठा केला जात असल्याचंही वृत्त आहे. म्हणजेच भारतीय लष्करावर चीनच्या इशारा आणि धमक्यांचा काहीच दबाव नाही याचे हे स्पष्ट संकेत आहेत.
सिक्कीमच्या डोकालम परिसरात चिनी रस्ते बांधकामावरून हा वाद सुरू झाला. या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय आणि चिनी लष्कर समोरासमोर आले आहेत.
कूटनितीच्या माध्यमातून भारत-चीन प्रकरणात तोडगा काढला जाईल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला. सीमेवरील संघर्षावर कूटनितीच्या माध्यमातून मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र चीनने या प्रकरणात अत्यंत आक्रमक पवित्रा घेत कोणत्याही ‘समेटा’ला तयार नसल्याचे म्हटले आहे. डोक्लाम प्रकरणात चेंडू भारताच्या कोर्टात आहे, असे म्हणत चीनने भारताने डोक्लाममध्ये मागे सरकावे, असा थेट संदेश दिला आहे.
डोकलाम भागात चीनने केलेल्या घुसखोरी आणि रस्त्याच्या बांधणीनंतर चीन आणि भारत यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच भूटानही चीनच्या या आक्रमक वृत्तीला विरोध करत आहे. चीनने तर भारताचा दावा खोडून काढत भारतानेच येथे हस्तक्षेप केल्याचा दावा केला आहे. त्याचप्रमाणे भारतीय सैन्य पुन्हा भारताच्या सीमेत गेल्याशिवाय कैलास मानस सरोवर यात्रेसाठी भक्तांना परवानगी देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तसेच जी-20 परिषदेमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बैठक घेणार नाहीत असेही परस्पर जाहीर करुन टाकले.