नवी दिल्ली - डोकलामवरुन भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला संघर्ष संपला असला तरी, अजूनही भारतीय सैन्य हाय अलर्टवर आहे. डोकलामचा वाद मिटल्याचे चित्र दिसत असले तरी, चीनने अजूनही या भागातून आपले सैन्य पूर्णपणे मागे घेतलेले नाही. त्यामुळे भारतीय सैन्य पूर्णपणे सर्तक आणि सज्ज आहे. डोकलामच्या ज्या भागात भारत आणि चीनचे सैनिक परस्परासमोर उभे ठाकले होते. त्या ठिकाणापासून काही मीटर अंतरावर चीनचे एकहजार सैनिक तैनात आहेत.
इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे. सिक्कीम सीमेजवळच्या डोकलाम भागात चीनने रस्ता बांधणीचे काम हाती घेतल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. अडीच महिने हा संघर्ष सुरु होता. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस भारत आणि चीनने परस्पर सहमतीने सैन्य मागे घेतल्याने या वादावर तोडगा निघाला. पण चीननं पुन्हा एकदा डोकलाम परिसरात रस्ता बनवण्यास सुरुवात केली आहे. तिथे चिनी सैनिकांच्या सुरक्षेमध्ये काम सुरु आहे.
चुंबी खो-यात अजूनही चिनी सैनिक तैनात आहेत. हवाई दल प्रमुख बी.एस.धानोआ यांनी काल गुरुवारी वार्षिक पत्रकारपरिषदेत चुंबी खो-यात चिनी सैनिक असल्याची माहिती दिली. डोकलामवरुन संघर्ष सुरु असताना चीनची 12 हजार सैनिकांची तुकडी, 150 रणगाडे आणि दारुगोळा चुंबी व्हॅलीच्या फारी ड्झाँग भागाच्या दिशेने मार्गस्थ झाले होते. येणा-या दिवसात चिनी सैनिकांची ही संख्या कमी होईल असे सूत्रांनी सांगितले.
दोन्ही देशांमध्ये तडजोडीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर 28 ऑगस्टला भारत आणि चीनचे सैनिक डोकलाममध्ये संघर्षाचा जो केंद्रबिंदू होता त्या ठिकाणापासून 150 मीटर मागे गेले. जून महिन्यामध्ये भारतीय जवानांनी सिक्कीममध्ये सीमा ओलांडून चीनच्या रस्ते निर्माण करण्याच्या काम थांबवलं होतं. या रस्त्याची निर्मिती चिकन नेक नावानं ओळखल्या जाणा-या भारतीय जमिनीजवळ केली होती. दरम्यान हा परिसर भारतासाठी भौगोलिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असा आहे. दरम्यान डोकलाम विवादावर जवळपास 70 दिवस भारत-चीनचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यानंतर उपाय योजना काढत हा वाद मिटवण्यात आला होता आणि दोन्ही देशांनी आपआपल्या सैनिकांना माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता.