नवी दिल्ली: डोकलाममध्ये चीनने घेतलेल्या भूमिकेमागे लष्करी किंवा वर्चस्ववादाचा हेतू नसून चीनला या माध्यमातून भारत आणि भूतानमध्ये फूट पाडायची होती. मात्र, भारताने ज्याप्रकारे चीनला प्रत्युत्तर दिले, ते कौतुकास्पद होते, असे विधान देशाचे माजी सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी केले. ते बुधवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, चीनला भारत आणि भूतान यांच्यात फूट पाडायची होती. त्यासाठी त्यांनी डोकलाम वाद उकरून काढला. यामागे चीनचा कोणताही लष्करी किंवा वर्चस्ववादाचा हेतू नव्हता. या सगळ्यामागे चीनचे व्यापक राजकारण होते. त्यांना भूतानला दाखवून द्यायचे होते की, भारत तुमचे रक्षण करू शकणार नाही. जेणेकरून त्यांचे भारताविषयीचे मत बदलेल. परंतु, भारताने डोकलाममध्ये चीनला ज्याप्रकारे प्रत्युत्तर दिले, ते निश्चितच प्रशंसनीय होते, असे मेनन यांनी म्हटले. शिवशंकर मेनन हे 2010 ते 2014 या काळात यूपीए सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. याशिवाय, त्यांनी ऑक्टोबर 2006 ते ऑगस्ट 2009 भारताचे परराष्ट्र सचिव म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे. गेल्यावर्षी डोकलाममध्ये 73 दिवस भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले होते. रत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा डोकलाममध्ये जिथे मिळतात त्या भागाला ट्राय जंक्शन म्हणतात. चीनने त्या ट्राय जंक्शनजवळ रस्ता बांधणीचे काम सुरु केल्यामुळे संघर्षाला सुरुवात झाली होती. कारण चीनने जर इथे रस्ता बांधला असता तर भारताचा सामरिकदृष्ट्या महत्वाचा भूभाग चीनच्या टप्प्यात आला असता.
'...तर भारत शेजाऱ्यांचे रक्षण करण्यास असमर्थ असल्याचा संदेश गेला असता'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 8:47 AM