नागपूर : चीनविरोधात केंद्र शासनाने घेतलेल्या भूमिकेची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी प्रशंसा केली आहे. चीनच्या राक्षसी महत्वाकांक्षेवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे व त्यासाठी आर्थिक क्षेत्रात, सामरिक क्षेत्रात, अंतर्गत सुरक्षा तसेच सीमा सुरक्षा व्यवस्थांमध्ये, शेजारी देशांसोबत तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये चीनहून मोठे स्थान प्राप्त करणे हाच एकमेव उपाय असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.कोरोनाच्या महामारीसंदर्भात चीनची भूमिका संशयास्पद राहिली हे तर म्हटलेच जाऊ शकते, मात्र स्वतःच्या आर्थिक, सामरिक बळामुळे उन्मत्त होऊन भारताच्या सीमांवर ज्या पद्धतीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तो संपूर्ण जगासमोर स्पष्ट झाला आहे. भारताचे शासन, प्रशासन, सैन्य तसेच जनतेने या आक्रमणासमोर उभे राहून आपला स्वाभिमान, दृढनिश्चय व शौर्याचा उज्वल परिचय दिला आहे. यामुळे चीनला अनपेक्षित धक्का मिळाल्याचे वाटत आहे. या परिस्थितीत आपल्याला सावध होऊन दृढ व्हावे लागेल. चीनने याअगोदरदेखील वेळोवेळी जगाला आपल्या विस्तारवादी मनोवृत्तीची ओळख दिली आहे. आर्थिक क्षेत्रात, सामरिक क्षेत्रात, आपली अंतर्गत सुरक्षा तसेच सीमा सुरक्षा व्यवस्थांमध्ये, शेजारी देशांसोबत तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये चीनहून मोठे स्थान प्राप्त करणे हाच त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेवर नियंत्रणाचा एकमेव उपाय आहे. या दिशेने आपल्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांची पावलेदेखील पडत आहेत, असे दिसून येते. श्रीलंका, बांगलादेश, ब्रह्मदेश, नेपाळ हे आपले शेजारी देश, जे आपले मित्रदेखील आहेत व मोठ्या प्रमाणात समान प्रकृतीचे देश आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला आणखी मित्रत्वाचे संबंध करण्याबाबत वेग वाढविला पाहिजे. या कार्यात अडथळे उत्पन करणारे मतभेत, मतांतरे, वाद इत्यादी मुद्दे त्वरित दूर करण्याचे आणखी प्रयत्न करावे लागतील, अशी अपेक्षा सरसंघचालकांनी व्यक्त केली.