मुंबई : चीनमधून काही वस्तू थेट भारतात येतात, तर काही अन्य देशांच्या मार्गे भारतात पाठविल्या जातात. भारतात येणारे चिनी बनावटीचे कपडे बांगलादेशमार्गे भारतात येतात. चीनपेक्षा बांगलादेशात कमी वेतनात मजूर उपलब्ध होत असल्याने चीन आपल्याकडील कापड बांगलादेशात पाठविते आणि तिथे ते शिवले जातात. नंतर तेथून तो माल ड्यूटी फ्री होऊ न भारतात येतो, याकडे क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे मुख्य मार्गदर्शक राहुल मेहता यांनी लक्ष वेधले.या सर्व प्रकारांत बांगलादेशच्या लोकांना रोजगार मिळत असला तरी फारसे वेतन मात्र मिळत नाही. म्हणजे त्यांची पिळवणूकच होते आणि भारतात मात्र चिनी कपडे म्हणून काही जण मिरवतात. वास्तविक भारतातील कापड उद्योेग खूप मोठा आहे आणि तो वाढवायला मोठ्या संधीही आहेत. त्यामुळे चिनी कापड वा तयार कपड्यांऐवजी भारतीय कपडे विकत घेतल्यास भारतात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. शाळा, रुग्णालये यासाठी लागणाऱ्या युनिफॉर्मचे कापड चीनहून बांगलादेशात जाणार आणि तिथे ते शिवून झाल्यावर भारतात विकणार, असे करण्याऐवजी भारतातच ठिकठिकाणी युनिफॉर्म हब करणे शक्य आहे. त्याची सुरुवात सोलापूरमध्ये झाली आहे. मात्र, त्याबाबत अधिक जनजागृती होण्याची गरज आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात परदेशी कपड्यांची होळी केली होती. आता मात्र अशी होळी न करता स्वदेशी कपडे वापरण्यासाठी जनमत तयार केले पाहिजे, असा मतप्रवाह आहे. मेडिकल प्रॉडक्टचे व्यापारी असलेल्या मनीष ठक्कर यांच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची महाराष्ट्रातील ७० टक्के बाजारपेठ चीनच्या ताब्यात आहे. यात स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रोत्साहन द्यायला हवे.कोरोना संसर्गाच्या काळात भारताते संशोधनापासून मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीटस्साठी मोठी आघाडी घेतली आहे. ती कायम ठेवल्यास वैद्यकीय उपकरणे आणि औषध उद्योग यासाठी भारताला चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही, असे या क्षेत्रातील मंडळींचे म्हणणे आहे.बहुतांश चिनी मोबाईल कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करून पाच वर्षांहून अधिक काळ झाला आहे. त्यांचे उत्पादन भारतातच होऊ लागल्याने, भारतीयांना रोजगार दिल्याने लवकरच यातील अनेक कंपन्यांचा माल हा ‘मेड इन इंडिया’ म्हणूनही मिळू लागेल. मात्र, यामधील गुंतवणूक चीनची असल्यामुळे फायदा मात्र चीनलाच होणार आहे. त्याऐवजी भारतीय तरुण आणि उद्योजक यांनी पुढाकार घेतल्यास आणि त्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन व साह्य मिळाल्यास जगातील मोबाईलची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारतातून चीन हद्दपार होऊ शकेल. शिवाय चिनी कंपन्यांच्या उत्पादनांची जाहिरात आपण करणार नाही आणि त्यांचे ब्रँड अॅम्बेसिडर बनणार नाही, अशी शपथ सेलिब्रिटींनी घ्यायला हवी.ब्रॅण्ड अॅम्बेसिडरपद सोडण्याची मागणीभारतामधील मोबाईलची बाजारपेठ चीनने काबीज केल्याचे दिसत आहे. ओप्पो, वनप्लस, विवो, रिअलमी आणि लिनोवो-मोटोरोला हे लोकप्रिय असलेले ब्रॅण्डस् हे चिनी कंपन्यांच्या मालकीचे आहेत. या ब्रॅण्डस्चे मोबाईल हे चीनमध्ये बनविलेले असून, त्यांचे सर्व पार्टस्ही चिनी बनावटीचे आहेत. त्यामुळे या फोन्सच्या विक्रीचा सर्व लाभ हा चीनला मिळत आहे.अनेक चित्रपट कलावंत व खेळाडू या ब्रॅण्डस्चे अॅम्बेसिडर आहेत. त्यामध्ये रणबीर कपूर (ओप्पो), रॉबर्ट डाउनी (ज्युनि) (वनप्लस), विराट कोहली (विवो) आणि सलमान खान (रिअल मी) यांचा समावेश आहे. या खेळाडू आणि कलावंतांनी चिनी कंपन्यांचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून काम करणे बंद करावे, अशी मागणीही केली जात आहे.उद्योजक म्हणतात...सध्या कोरोनामुळे चीनला तीन महिने फटका बसला आहे; पण तेवढ्याने भागणार नाही.चिनी माल चीनमधूनच नव्हे, तर तो नेपाळ, बांगलादेश, तैवानमार्गेही येतो. त्या देशांना चीनकडून होणारा आर्थिक फायदा वळवून तो भारताकडून होईल, अशी व्यवस्था उभी करायला हवी.सध्या चीन व तैवानमधून येथून यंत्रे आणून त्यांच्याकडून भारतात थेट गुंतवणूक होत आहे. त्याद्वारे भारतातच ५० टक्के माल तयार होतो. उरलेला अन्य देशांमार्फत येतो.चिनी आक्रमणाला तोंड देऊ न आपल्या धोरणात बदल करणारे व्यापारी टिकले. मात्र, छोटे व्यापारी भरडले जात आहेत. त्यासाठी उत्पादन, आयात आणि व्यापारविषयक धोरणामध्ये बदल करायला हवेत, अशी मागणी व्यापारी आणि त्यांच्या संघटना करीत आहेत.
युनिफॉर्म हब निर्माण झाल्यास चीनला फटका; बसणार मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 12:35 AM