नवी दिल्ली – गेल्या महिनाभरापासून रशिया आणि यूक्रेन(Russia Ukraine) यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. त्यातच यूक्रेन संकटाचा हवाला देत काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी(Congress Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारला सतर्क केले आहे. रशियासारखं कृत्य चीनदेखील करू शकते. स्वत: सरकारने हे मान्य केले की, चीननं देशातील पॉवर ग्रीड हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.
राहुल गांधी म्हणाले की, मागील ४ महिन्यात तीन वेळा चीनने असा प्रयत्न केला परंतु त्यांचा हेतू साध्य झाला नाही. चीनच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष संसदेत चर्चा करू इच्छित होता परंतु ते झाले नाही. रशिया म्हणतो, डोन्सात्क, लुहान्स्क हा भाग यूक्रेनचा नाही. त्यामुळे रशियाने यूक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्याचं टार्गेट नाटो, यूक्रेन आणि अमेरिकेशी भागीदारी तोडण्याचं होते. तसेच चीनही भारतासोबत करू शकते. लडाख आणि अरुणचाल प्रदेश तुमचं नाही, भारताचं सैन्य त्याठिकाणी आहे. सरकारकडे याकडे दुर्लक्ष करत आहे. पण चीनने ते याठिकाणीही लागू करू शकते असं ते म्हणाले.
तसेच सरकार सत्य स्वीकारत नाही. जर सत्य स्वीकारलं नाही आणि तयारी केली नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते. तेव्हा तुम्ही रिएक्टही होऊ शकणार नाही असं सांगत राहुल गांधींनी इतर मुद्यावरूनही सरकारला टार्गेट केले. ज्या देशात शांतता नाही तिथे महागाई वाढत राहणार, द्वेष वाढत जाणार. आर्थिक धोरण चालवू शकत नाही. रोजगारही मिळणार नाही. जर देशाला मजबूत ठेवायचं असेल तर शांतता हवी. द्वेष पसरवून, लोकांना घाबरवून, मारून देशाची आर्थिक परिस्थिती मजबूत करत येत नाही असं राहुल गांधींनी म्हटलं.
देशाची स्थिती श्रीलंकेसारखी होत आहे का?
या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, भारताच्या आर्थिक स्थितीची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. जे भविष्यात येणार आहे ते तुम्ही आयुष्यात पाहिले नसेल. कारण देशातील रोजगार व्यवस्थेचा कणाच मोडकळीस आलेला आहे. जे छोटे मध्यम व्यवसाय, छोटी दुकाने, अनौपचारिक क्षेत्र चालवतात, ते आर्थिक कणा आहेत. मात्र याला काही अर्थ नाही असं मोठमोठे अर्थतज्ञ आणि नोकरशहांना वाटतं. ते इतर देश बघून आपली योजना बनवतात. दक्षिण कोरियाने जे केले, ते आपणही केले पाहिजे, असे पंतप्रधानांच्या मनात आहे. ते बाहेर पाहतात. तसं काम करू शकत नाही. आपण कोण आहोत आणि इथे काय चालले आहे हे ओळखले पाहिजे. हा आर्थिक कणा त्यांनी मोडला आहे, त्याचा परिणाम येत्या दोन-तीन-चार वर्षात समोर येईल आणि भयानक परिणाम येतील अशीही भीती राहुल गांधींनी व्यक्त केली आहे.