नवी दिल्ली - मागच्यावर्षी डोकलाम मुद्यावरुन भारत-चीनमध्ये संबंध कमालीचे ताणले गेले होते. चीनकडून वारंवार युद्धाची भाषा केली जात होती. भारतातही सोशल मीडियावर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी करणारे मेसेजेस फिरत होते. पण प्रत्यक्षात या संदेशांनी काहीही फरक पडलेला नाही. आकडेवारीवर नजर टाकल्यास भारत आणि चीनमधील व्यापार 84.44 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.
भारत-चीन व्यापारामध्ये नेहमीच चीनचा वरचष्मा राहिला आहे. पण 2017 मध्ये भारताकडून चीनला होणाऱ्या निर्यातीमध्ये 40 टक्के म्हणजे 16.34 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. 2017 सालात भारत-चीनमध्ये द्विपक्षीय व्यापारामध्ये 18.63 टक्के वाढ झाली आहे. पहिल्यांदाच 80 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला. मागच्यावर्षी दोन्ही देशांमध्ये 71.18 अब्ज डॉलर व्यापाराची नोंद झाली होती.
चीन-पाकिस्तानी इकोनॉमिक कॉरिडोअर, संयुक्त राष्ट्रात जैशचा मोहोरक्या मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्यात चीनने घातलेला खोडा, एनएसजी देशांच्या समूहात भारताच्या प्रवेशाचा चीनने रोखलेला मार्ग किंवा डोकलामवरुन 73 दिवस दोन्ही देशांमध्ये चाललेला संघर्ष इतके वादग्रस्त मुद्दे असूनही व्यापार, आर्थिक संबंधांवर त्याचा काही परिणाम झाला नाही. उलट दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढला. 2015 मध्ये दोन्ही देशांनी 100 अब्ज डॉलरच्या व्यापाराचे लक्ष्य ठेवले होते. मागची अनेकवर्ष दोन्ही देशांमधला व्यापार 70 अब्ज डॉलरच्या घरात होता.