नवी दिल्ली - गलवान खोऱ्यातील चकमकीनंतर गेल्या वर्षभरापासून चीन आणि भारत यांच्यातील सीमा संघर्ष वाढला आहे. चीन आणि भारताचे सैन्य सीमा भागात शांतात राहावी यासाठी प्रयत्न करत असले तरी चीनचं भारताविरुद्धचं षडयंत्र सुरू आहे. त्यात आता अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी केलेल्या विधानानंतर जगासमोर चीनचा खरा चेहरा समोर आला आहे.
राजा कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, भारत आणि चीन यांच्या वास्तविक नियंत्रण रेषेजवळ पीपुल्स लिबरेशन आर्मीने नवीन चौकी बांधली आहे. बीजिंगच्या वाढत्या आक्रमणाचे हे चिंताजनक संकेत आहेत. त्यामुळे अमेरिकेकडून भारतासोबत सुरक्ष संबंध आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे. चीनने भारतासोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर विवादित जागेवर सैन्याची छावणी बांधली आहे असं त्यांनी म्हटलं.
सेंटर फॉर स्ट्रेटेजिक एंड इंटरनॅशनल स्टडीज चायना पॉवर प्रोजेक्टकडून मिळालेल्या आणि नेटसेक डेलीनं शेअर केलेल्या फोटोवरून दिसून येते की, पीपुल्स लिबरेशन आर्मीने पेंगोंग तलावाजवळ सैनिकांना थांबण्यासाठी एक मुख्यालय आणि छावणी निर्माण केली आहे. चीनी कम्युनिस्ट पार्टीने त्यांच्या मूळ विचारधारेवर चालणं अजून सोडलं नाही. देशात आजही अशांतता, मुस्लीम समुदायाचा छळ, आणि चुकीची माहिती पसरवली जात आहे असंही राजा कृष्णमूर्ती यांनी सांगितले.
चीनच्या आक्रमक महत्त्वकांक्षांसमोर संयुक्त राज्य अमेरिकेने त्यांच्या सहकारी देशांसोबत सुरक्षा आणि गुप्ततर सहकार्य वाढवलं पाहिजे आणि त्याचा विस्तार केला पाहिजे. संयुक्त राज्य अमेरिका, भारत, तैवान आणि संपूर्ण क्षेत्रात लोकशाहीसोबत उभे आहोत असा स्पष्ट संदेश जगासमोर येईल. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीची वाढत्या आक्रमकतेचा चेहरा जगासमोर आणायला हवा असंही खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, चीन आपले लष्करी सामर्थ्य प्रचंड वेगाने वाढवीत असून, हीच गती कायम राहिल्यास या देशाकडे २०३५ पर्यंत १५०० अण्वस्त्रे असतील हे चिंताजनक आहे असा दावा अमेरिकेच्या पेंटॅगानने केला आहे. सध्या चीनकडे ३५०हून अधिक अण्वस्त्रे आहेत. २०२१मध्ये चीनने जगातील सर्वाधिक १३५ क्षेपणास्त्र चाचण्याही केल्या. सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला चीन आपल्या लष्कराला सामर्थ्यशाली करण्यासाठी अण्वस्त्रांच्या संख्येत वाढ करण्याच्या प्रयत्नात आहे. चीनची धोरणे जगासाठी अतिशय घातक असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"