नवी दिल्ली : भारत-चीन संबंध हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी दोन्ही देशांमधील राजनैतिक अधिकारी सातत्याने चर्चा करीत आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात चीनच्या तीन शहरांसाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याची चाचपणी सुरू केली आहे. मात्र, त्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचेही मत विचारात घेतले जाईल.
गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर भारताने चीनची कोंडी करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. भारतातील गुंतवणूक व व्यापारी संबंध पाहता आता चीनकडूनच विमानसेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयात बैठकांचे सत्र सुरू आहे.मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण बंद आहे. व्हिजादेखील दिले जात नाहीत. सलग पाच महिने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने जागतिक अर्थकारणही थांबले आहे. भारत पहिल्या टप्प्यात काही देशांसाठी विमाने सुरू करेल. त्यात चीनचाही समावेश असू शकतो.
गलवान झटापटीनंतर चीन व भारतादरम्यान त्रिस्तरीय चर्चा सुरू आहे. दोन्ही देश स्वहद्दीत मागे हटले. अत्याधुनिक शस्त्रात्रे हटवण्यावरही चर्चेत भर होता. व्यापारवृद्धी, सांस्कृतिक-शैक्षणिक आदान-प्रदान (एक्स्चेंज) करण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांचे दूतावास त्या-त्या देशात तसे अनेक कार्यक्रम आयोजित करीत आहेत.
व्यापार पूर्वपदावर आणण्यासाठी...
परदेशी अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालयाने अभियान सुरू केले. व्यापार पूर्वपदावर आणण्यासाठी चीन व भारतादरम्यान विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये चीनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होईल. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी चीनमध्ये येतील. त्यांच्यासह सर्व श्रेणीतील व्हिजा निवडक देशांना देण्यास चीनने सुरुवात केली आहे.
भारतीयांनादेखील मर्यादित संख्येत; परंतु सर्व श्रेणीत व्हिजा दिले जातील. विमानसेवा सुरू करताना चीनमधील तीन शहरांना जोडण्याचा प्रस्ताव चिनी परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. भारतामध्ये कोरोनाचा कहर वाढला असला तरी फिजिकल डिस्टसिंग, पुरेशी काळजी घेऊन प्रवास सुरू केला जाईल.