नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) हे मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर विविध मुद्द्यांवरून टीका करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी "चीनची वाढती घुसखोरी आणि पंतप्रधानांचे मौन हे देशासाठी अत्यंत घातक" आहे असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. आपल्य़ा ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
"पंतप्रधानांचे सत्य - 1. चीनला घाबरतात, 2. जनतेपासून सत्य लपवतात, 3. फक्त आपली प्रतिमा जपतात, 4. सैन्याच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करतात, 5. देशाच्या सुरक्षेशी खेळ करतात. चीनची वाढती घुसखोरी आणि पंतप्रधानांचे मौन हे देशासाठी अत्यंत घातक" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी याआधी उदयपूरमधील हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. "धर्माच्या नावावर सुरू असलेली क्रूरता खपवून घेतली जाणार नाही" असं म्हणत संताप व्यक्त केला होता. तसेच गुन्हेगारास लवकरात लवकर शिक्षा मिळावी, असं ही ते म्हणाले होते.
"उदयपूरमध्ये जी निर्घृण हत्या झाली त्यामुळे मला धक्का बसला आहे. धर्माच्या नावावर सुरू असलेली क्रूरता खपवून घेतली जाणार नाही. दहशत पसरविणाऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे. आपल्या सर्वांना सोबत येऊन द्वेषाचा पराभव करायचा आहे. सर्वांनी शांतता आणि बंधुभाव राखावा, असे माझे आवाहन आहे" असं राहुल यांनी म्हटलं होतं.