शीलेश शर्मा नवी दिल्ली : सिक्कीमला खेटून असलेल्या चीन सीमेवर झालेल्या संघर्षाच्या ताज्या घटनेनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला करताना म्हटले की, सरकारच्या दुबळ्या धोरणांमुळेच चीनला भारतीय सीमेत घुसून कब्ज़ा करण्याची संधी मिळत आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, “चीन त्याचा विस्तार करून भारतीय क्षेत्रात कब्जा करीत आहे. मिस्टर ५६ इंच यांनी अनेक महिन्यांत चीन शब्द उच्चारला नाही. ते किमान चीन शब्द उच्चारून सुरुवात करू शकतात.” गांधी यांची अशीही टिप्पणी होती की, सरकारचे काम होते ते चीनला सीमेवर रोखण्याचे. सत्याग्रही अन्नदात्यांना दिल्ली सीमेवर अडविण्याचे नाही. राहुल गांधी यांनी सतत चीनवरून मोदी सरकारवर हल्ले केले व चीनने भारतीय सीमेत शिरून कब्जा केल्याचे आरोप केले आहेत. सरकार मात्र ते फेटाळत आहेत. आजही सेनेकडून नाथुला सीमेवर चीन आणि भारतीय सेनेत झालेली झडप ही एक आठवड्यापूर्वीची असल्याचे सांगितले जाते.
चीनच्या विषयात देशाला विश्वासात घ्यावेकाँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी सल्ला दिला की, मोदी यांनी चीनच्या विषयात देशाला विश्वासात घ्यावे. त्यांनी मोदी यांच्यावर आरोप केला की, “देशाच्या सीमेत चिनी अतिक्रमण आणि घुसखोरीवर पंतप्रधानांच्या गूढ मौनामुळे शत्रूचा आत्मविश्वास वाढत आहे. चीनला घाबरू नका. संपूर्ण देश मजबुतीने लढेल. परिस्थिती काय आहे हे स्पष्टपणे सांगा. राष्ट्रीय सुरक्षा हा लपाछपीचा खेळ नाही. परिस्थिती गंभीर आहे.”