चीनची घुसखोरी : काँग्रेसचा हल्लाबोल, जगभरात चर्चा आहे, मात्र पंतप्रधान गप्प का आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 07:25 AM2021-11-22T07:25:16+5:302021-11-22T07:26:12+5:30
काँग्रेसने असा सवाल केला आहे की, चिनी सैन्याकडून भारतीय सीमेला लागून असलेल्या भागात बांधकाम होत आहे. जगभरात याची चर्चा आहे. मात्र, पंतप्रधान मोदी गप्प का आहेत?
शीलेश शर्मा -
नवी दिल्ली : भारतीय सीमेत चीनकडून झालेली घुसखोरी हा निवडणुकीचा मोठा मुद्दा करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहे. या मुद्यावरून अनेक दिवसांपासून सरकारला लक्ष्य करत असलेल्या काँग्रेसने अरुणाचलला लागून असलेल्या भागाचे एक चित्र जारी करत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेसने असा सवाल केला आहे की, चिनी सैन्याकडून भारतीय सीमेला लागून असलेल्या भागात बांधकाम होत आहे. जगभरात याची चर्चा आहे. मात्र, पंतप्रधान मोदी गप्प का आहेत? पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी पंतप्रधानांना विचारले आहे की, भारतीय सीमा क्षेत्राच्या सहा ते सात किमीमध्ये चीनने व्यापक प्रमाणात बांधकाम आदी उभारणी केली आहे. यावर सरकारने काय कारवाई केली? चीनकडून कब्जा होत असताना सरकार झोपेत होते. त्यांनी आरोप केला की, सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर दुर्लक्ष चालविले आहे. संरक्षण, विदेश मंत्रालय यांच्यात समन्वय नाही.
राहुल गांधींची टीका
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्यावर दोन दिवसांपूर्वीच मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, चीनने जो ताबा घेतला आहे त्याचे वास्तवसुद्धा आता स्वीकारावे लागणार आहे. यापूर्वीही राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीबाबत सरकारला लक्ष्य केलेले आहे.