नवी दिल्ली, दि. ७ - भारत आणि चिनमध्ये उद्भवलेला डोकलाम विवाद तब्बल सव्वा दोन महिन्यानंतर शांत झाला खरा, पण आता डोकलाम प्रश्नावरू चीनचे लष्कर आणि तेथील राजकीय नेतृत्वामध्ये मदभेद उद्भवले आहेत. विवादित भागातून दोन्ही देशांचे सैन्य मागे हटल्याची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात सैन्य केवळ १५० मीटर अजून मागे आले आहे. चिनी लष्कराच्या दबावामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यातच येत आहे. तर चिनचे राजकीय नेतृत्व मात्र हा वाद पूर्णपणे मिटवण्याच्या बाजूने आहे. १६ जून रोजी भारत, चीन आणि भूतान यांच्या सीमांवर वसलेल्या डोकलाम परिसरात भारत आणि चिनचे लष्कर आमने सामने आले होते. त्यानंतर दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांपासून केवळ १५० मीटर अंतरावर उभे होते. दरम्यान, हा वाद मिटवण्यासाठी आपापले सैन्य मागे घेण्यावर दोन्ही देशांचे एकमत झाले होते. मात्र दोन्ही देशांचे लष्कर अजून १५० मीटर मागे येऊन उभे राहिल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनचे राजकीय नेतृत्व डोकमालमध्ये १६ जून पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण करण्यास तयार आहे. मात्र चीनच्या लष्कराकडून त्यात खोडा घालण्यात येत आहे. चिनी लष्कराच्या दबावामुळेच डोकलाममधून आधी भारताने माघार घ्यावी अशी अट चिनकडून घालण्यात आली होती. भारताने यावर अंमलबजावणी करताना आपल्या सैन्याच्या माघारीची सूचना चिनला दिली. मात्र चिनी सैन्याने आपल्याकडून माघारीची सूचना देण्यास उशीर केला. अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर चिनी सैन्य मागे गेले होते. त्यामुळे दोन्ही देशांचे सैन्य या प्रदेशातून पूर्णपणे माघार कधी घेईल याबाबत काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही. सिक्कीम बॉर्डरवर भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला वाद अखेर २८ ऑगस्टला मिटला होत. दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेण्याची तयारी दर्शवत या वादावर पडदा टाकला होता. जून महिन्यात डोकलामवरुन वाद सुरु झाला होता. दरम्यान, ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट झाली होती. जवळपास एक तास चाललेल्या या द्विपक्षीय बैठकीत दोन्ही देशांनी डोकलामसारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यावर सहमती दर्शवली होती. 'सुरक्षा जवानांनी चांगला संपर्क ठेवत काही दिवसांपुर्वी निर्माण झालेली परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे', असे भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी या भेटीनंतर सांगितले होते.
डोकलाम प्रश्नावरून चीनचे लष्कर आणि राजकीय नेतृत्वामध्ये मतभेद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2017 8:54 PM