ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - भारताचा सामना करण्यासाठी चीनने तिबेटमध्ये 35 टन वजनाचे नवीन रणगाडे तैनात केले आहेत. पिपल्स लिबरेशन आर्मीने तिबेटमध्ये या रणगाडयाच्या चाचण्या घेतल्या. चाचण्या आणि रणगाडयाची तैनाती कुठल्या एका देशाला लक्ष्य करण्याच्या इराद्याने केलेली नाही असे चीनी लष्कराचे प्रवक्ते वु कीयान यांनी सांगितले. भारताला लागून असलेल्या तिबेटच्या सीमावर्ती भागात हे रणगाडे तैनात केले आहेत.
भारतीय सैन्याला डोळयासमोर ठेऊन चीन तिबेटमध्ये लष्करी सामर्थ्य वाढवत असल्याचे गुआचा वेबसाईटच्या वृत्तात म्हटले होते. भारताने रशियन बनावटीचे जे T-90 रणगाडे तैनात केलेत त्यापेक्षा चीनच्या नवे रणगाडे तंत्रज्ञान आणि मारकक्षमतेमध्ये उजवे आहेत असे वेबसाईटने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले होते. डोंगराळ भागातील युद्धाच्या तयारीने हे रणगाडे बनवण्यात आले आहेत.
आणखी वाचा
भारताने मागच्यावर्षी लडाख आणि चीनला लागून असलेल्या सीमावर्ती भागात 100 पेक्षा जास्त T-72 रणगाडे तैनात केले. सिक्कीमध्ये चीनी सैन्याच्या घुसखोरीमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनने या भागातील भारतीय बंकर बुलडोझरच्या सहाय्याने उध्वस्त केले.
दरम्यान भारतीय हद्दीत घुसखोरी करणा-या चीनने उलट भारतावरच नियम मोडल्याचा आरोप केला आहे. सिक्कीमच्या डोकाला भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घुसखोरी करुन भारतीय जवानांना धक्काबुक्की केल्याने दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. भारत नियमबाहय कामे करत असून त्यांना नियम शिकवण्याची गरज असल्याचे ग्लोबल टाइम्स या चीन सरकारच्या वर्तमानपत्राने म्हटले आहे.
भारताला अमेरिका आणि अन्य पाश्चात्य देश पाठिंबा देत असल्याने आपण सैनिकी दृष्टया वरचढ असल्याची भारताची भावना असून त्यामुळे भारत उद्दामपणा करतोय असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले आहे. भारताचा जीडीपी जगात पाचव्या क्रमांकावर असल्याने देश म्हणून भारताचा आत्मविश्वास सध्या भलताच उंचावला आहे. पण भारत अजून चीनपेक्षा भरपूर मागे आहे हे भारताने लक्षात घ्यावे असे ग्लोबल टाइम्समध्ये म्हटले आहे. सीमावादाला भारताकडून चिथावणी मिळते तरीही, चीन शांतता आणि संयम राखून असल्याचे लेखात म्हटले आहे.