श्रीनगर : मी सेवानिवृत्त सैनिक आणि लडाखमधील नागरिकांना भेटल्यानंतर ते म्हणाले की, चीनने आपली २ हजार किलोमीटर जमीन घेतली आहे. भारतातील अनेक गस्ती चौक्या चीनने बळकावल्या आहेत. सरकारने येथील नागरिकांचे म्हणणे नाकारणे अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे चीनचा आत्मविश्वास वाढेल, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा प्रदान करणे तसेच तिथे लोकशाही प्रक्रिया पुन्हा सुरू करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने सरकारने पहिले पाऊल उचलायला हवे, असे राहुल यांनी सांगितले.
लाल चौकात गांधी यांनी तिरंगा ध्वज फडकाविला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, प्रेम, आपुलकी, दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणे या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याबाबतीत भूतकाळात ज्या गोष्टी झाल्या त्याबद्दल मी आता काही भाष्य करणार नाही. मला भविष्यकाळाचे वेध लागले आहेत.
भारत जोडोच्या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले. लोकांना एकत्र आणणे, द्वेष संपवणे, हे यात्रेचे ध्येय होते. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव आहे... प्रवास इथेच संपत नाही, तर ती पहिली पायरी आहे, ही सुरुवात आहे.- राहुल गांधी, काँग्रेस खासदार
‘घरी आल्यासारखे वाटले’ राहुल गांधी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी, युवक अशा सर्वांची मी भेट घेतली. त्यापैकी कोणीही काश्मीरमधील सध्याच्या स्थितीबद्दल समाधानी नाही. आमचे घराणे मूळचे काश्मीरचे आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये येताना मला विलक्षण आनंद झाला. आपल्या घरी आल्यासारखे वाटले.
३७० कलम...३७० कलम रद्द करण्याबाबतच्या प्रश्नावर राहुल म्हणाले की, याबाबत काँग्रेसने आपली भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा द्यायला हवा. लोकशाही प्रक्रिया सुरू होणे हा तेथील जनतेचा मूलभूूत अधिकार आहे.
काश्मीरमध्ये निरपराध लोकांच्या हत्याराहुल म्हणाले की, काश्मीरमध्ये अद्यापही निरपराध लोकांच्या हत्या सुरू असून, बॉम्बस्फोट घडविले जात आहेत. त्यामुळे काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेच्या स्थितीत सुधारणा झाल्याचा भाजपचा दावा फोल आहे.